अंनिसची भंपकगिरी चालूच !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या दिवाळीत ‘फटाके न फोडता मुलांना पुस्तके भेट द्या’, असे आवाहन करण्यात आले होते. या अभियानाद्वारे फटाक्यांवर होणारा व्यय वाचवून मुलांना विज्ञानाची आवड निर्माण होईल, अशी पुस्तके देण्याचा म्हणे त्यांचा उद्देश होता. आता सर्वच जण विज्ञानयुगातच रहात आहेत. मुले लहानपणापासून वैज्ञानिक उपकरणे हाताळत आहेत. एका अर्थाने विज्ञानाचे दुष्परिणाम लक्षात येऊन वैज्ञानिक प्रदूषणच अधिक झाले आहे. त्यामुळे मुलांमध्ये वैज्ञानिक नव्हे, तर अध्यात्माची आवड निर्माण करणे, ही आज काळाची आवश्यकता आहे.

सण-उत्सव हे उपासनेचे मोठे माध्यम आहे. त्यामुळे हिंदूंना आध्यात्मिक ऊर्जा तर प्राप्त होतेच; परंतु त्यामुळे हिंदूंची धर्माशी असलेली नाळ अतूट रहाते. सणांमुळे आपापसांतील वाद बाजूला ठेवून समाज एकत्र येतो आणि गुण्यागोविंदाने रहातो. हिंदुद्वेषाची झापडे ओढलेल्या अंधश्रद्धाळू अंनिसला हे काय कळणार ? मुलांना पुस्तके भेट द्यायचीच असतील, तर ती दिवाळीचे शास्त्र, आपल्या परंपरांचे आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगणारी, आपल्या ऋषिमुनींच्या विज्ञानाधिष्ठित परंपरांची ओळख करून देणारी, हिंदु धर्माची, संस्कृतीची का नसावीत ? अशी पुस्तके दिली, तर मुलांची केवळ वाचनवृत्तीच वाढणार नाही, तर त्यांना आपल्या धर्माचा अभिमानही वाटेल.

हिंदूंच्या सणांच्याच वेळी तलवार उपसून सरसावणार्‍या अंनिसने बकरी ईदच्या दिवशी ‘बकरी न कापता दान करा’, असे आवाहन कधीही केलेले नाही. देशात वर्षभर होणारे भयावह जलप्रदूषण आणि पशूवधगृहातील रक्तमिश्रित पाण्याचे प्रदूषण रोखण्याचे साधे आवाहनही आतापर्यंत अंनिसने कधी केले नाही. त्यामागे तिचे काय लागेबांधे आहेत ? ‘येशूच्‍या प्रार्थनेने कर्करोग, एड्‍स यांसारखे गंभीर आजार बरे होतात’, असा दावा करणार्‍या ख्रिस्ती संस्‍थांच्‍या मागे अंनिस का लागत नाही ? होळीलाही पुरणपोळी अग्नीत अर्पण न करता ती दान करण्याचे आवाहन केले जाते. पुरणपोळी अग्नीत अर्पण करणे यामागे काही शास्त्र आहे. ते समजून न घेता उठसूठ हिंदूंचा सण आला की, त्यांच्या धार्मिक प्रथेविरोधात बोलायचे, असा विडाच अंनिसने उचलला आहे. अर्थात् हिंदू त्याला किंमत देत नाहीत, हा भाग वेगळा ! त्यामुळे हिंदूंच्या प्रथा-परंपरा मोडीत काढण्याचा अंनिसचा छुपा हेतू विफल होतो.

अन्य धर्मियांविषयी चकार शब्दही न काढता अंनिसने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव, रंगपंचमी, होळी, दिवाळी, नवरात्र’, अशी संकल्पना निर्माण केली आणि नकळतपणे सण-उत्सव प्रदूषणकारी आहेत, हे हिंदु समाजाच्या मनावर बिंबवले. ‘सण-उत्सव पर्यावरणपूरकच असायला हवेत’, याविषयी कुणाचे मतभेद नाहीत; मात्र ‘हिंदूंचे सण प्रदूषणकारी असतात’, हे समाजात बिंबवून हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा जुनाच कुटील डाव मात्र अंनिस अद्यापही वारंवार खेळतच आहे !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे