Police uniform : आता देशभरात पोलिसांचा गणवेश एकसारखा करण्याची सिद्धता !

‘वन नेशन, वन पोलीस युनिफॉर्म’ (एक देश, पोलिसांचा एक गणवेश) योजनेसाठी अहवाल मागवला !

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – केंद्र सरकार आता संपूर्ण देशात ‘वन नेशन, वन पोलीस युनिफॉर्म’ ही योजना राबवण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील पोलिसांचा गणवेश एकसारखा करण्याची सिद्धता चालू आहे. गृहमंत्रालयाने या योजनेसाठी १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून त्यांच्या सध्याच्या गणवेशाची माहिती मागवली आहे. ही माहिती शिपायापासून उपअधीक्षक (डी.एस्.पी.) पदापर्यंत सर्व स्तरांवरील गणवेशांशी संबंधित असावी, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ‘देशभरातील पोलिसांना एकसमान रूप मिळावे आणि एकतेची भावना दृढ व्हावी’, हे या योजनेमागे उद्दिष्ट आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये हरियाणातील फरीदाबाद येथे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन नेशन, वन पोलीस युनिफॉर्म’ हा विचार प्रथम मांडला होता.

१. सध्या बहुतांश राज्यांतील पोलीस खाकी रंगाचा गणवेश परिधान करतात; परंतु कोलकाता, तमिळनाडू येथील पोलीस पांढर्‍या रंगाचा गणवेश परिधान करतात.

२. ब्रिटीश काळात पोलीसदलाची स्थापना झाली, तेव्हा गणवेश पांढर्‍या रंगाचा होता; कारण तो रंग सुसंस्कृत आणि राजघराण्याचा मानला जायचा; पण लवकरच ब्रिटीश अधिकार्‍यांना जाणवले की, पांढर्‍या कपड्यांवर थोडीशी धूळसुद्धा लगेच दिसते आणि गणवेश स्वच्छ ठेवणे कठीण जाते.

३. या समस्येमुळे नवीन प्रयोग चालू झाला. १९ व्या शतकाच्या मध्यात ब्रिटिशांनी पोलीस गणवेशाला धुळीसारखा रंग देण्यास चालू केला. वर्ष १८४७ मध्ये ‘खाकी’ला पोलिसांच्या अधिकृत गणवेशाचा दर्जा दिला गेला. (परकियांच्या गुलामगिरीची चिन्हे देश स्वतंत्र होऊन ७८ वर्षे झाली, तरी केव्हा सोडणार आहोत ? हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)

४. वर्षानुवर्षे विविध राज्यांनी त्यांच्या पोलीस गणवेशात अनेक पालट केले. देहली पोलिसांनी खाकी रंगात थोडा पालट करण्याचा प्रयत्न केला; पण नवीन गणवेश अजून अधिकृत झालेला नाही.