‘किल्ले बांधणी स्पर्धा’ : एक अभिनव सांस्कृतिक परिवर्तनाचा उपक्रम !

किल्ला

शिवप्रेमी संघटनेची ‘किल्ले बांधणी स्पर्धा’ ही एक प्रेरणादायक आणि सामाजिकदृष्ट्या हितकारक संकल्पना गोव्यातील तरुणांपुढे आली आहे. अनेक वर्षांपासून दिवाळीच्या काळात गोव्यात नरकासुर प्रतिमा बनवण्याचा प्रघात होता; पण या प्रथेत शिरलेल्या गैरप्रकारांमुळे समाजाला होणारा अपाय आणि त्यातून मिळणारी नकारात्मक प्रेरणा सर्वांनाच त्रासदायक वाटत होती. या जागी एक नवा, सकारात्मक, इतिहासाची जाणीव करून देणारा आणि समाजाला प्रेरणा देणारा पर्याय हवाच होता. यासाठी शिवप्रेमी संघटना आणि मर्दनगड संवर्धन समिती यांनी एकत्र येऊन ‘किल्ले बांधणी स्पर्धा’ योजनेची कल्पना राबवली. हे स्पर्धेचे आयोजन तरुणांमध्ये इतिहास आणि शौर्याची बीजे पेरणारे ठरले. किल्ले हे महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या संस्कृतीचा गौरव आहेत. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा, किल्ल्यांच्या स्थापत्य आणि संरक्षण कलांचा अभ्यास या स्पर्धेमुळे युवकांपर्यंत सहजपणे पोचला. केवळ ऐतिहासिक जाणच नव्हे, तर संघटनात्मक काम, सांघिकता, कलात्मकता आणि सकारात्मक स्पर्धा ही मनोभूमिका या माध्यमातून आकारत गेली.

गावागावांतील युवक, विद्यार्थी आणि पालक यांचा स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक गावांमधून वेगवेगळ्या संघांनी किल्ल्यांचे सुंदर आणि आकर्षक सादरीकरण केले. या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा, संघभावना आणि सृजनशीलता वाढीस लागली. समाजाला योग्य दिशा देणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. कोणतीही प्रथा किंवा परंपरा काळानुसार पालटणे महत्त्वाचे असते. नव्या पिढीला योग्य आदर्श आणि प्रेरणा मिळण्यास असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. ‘किल्ले बांधणी स्पर्धे’ने समाजाला सकारात्मकता, आदर्श आणि इतिहासाची खरी दिशा दाखवली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करावे तेवढे थोडेच !

– श्री. नारायण नाडकर्णी, खडपाबांध, फोंडा, गोवा.