
मुंबई – नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाचे उत्कृष्ट आणि प्रभावी नियोजन करून नाशिकचा लौकिक देशभरात होईल, असे नियोजन करावे, असे आवाहन कुंभपर्व मंत्री तथा मंत्री समिती प्रमुख गिरीश महाजन यांनी केले. सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त २९ ऑक्टोबर या दिवशी मंत्रालयामध्ये विविध विभागांच्या वतीने राबवण्यात येणार्या विकास प्रकल्पांचा आढावा गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्या वेळी बोलत होते. गिरीश महाजन म्हणाले की, नाशिकचे कुंभपर्व पावसाळ्यामध्ये होत असल्याने विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने सर्व शक्यतांची पडताळणी करून कार्यवाही करावी. १२ वर्षांपूर्वीच्या कुंभपर्वाचा अनुभव लक्षात घेता या वेळी येणार्या भाविकांची संख्या अधिक असल्याने राज्यशासन सूक्ष्म नियोजन करत आहे.
१. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रामकुंडावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाविषयी समाधान व्यक्त केले. ‘ज्या सुविधा कुंभपर्वाच्या निमित्ताने उपलब्ध होत आहेत, त्या नाशिकच्या जनतेला कायमस्वरूपी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीकोनातून नियोजन होणे आवश्यक आहे. गोदावरी नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी वेगळे करण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी’, असे त्यांनी निर्देशित केले.
२. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, नाशिक येथे नव्याने रुग्णालय उभारण्याची आवश्यकता आहे. ज्या सुविधा उभारण्यात येत आहेत, त्यांचा वापर भविष्यात झाला पाहिजे. नाशिक जिल्ह्यातील अन्य तीर्थक्षेत्रांचाही विकास या निमित्ताने व्हावा.
३. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अधिवक्ता माणिकराव कोकाटे यांनी सांगितले, ‘‘द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपुलाविषयी प्रशासनाने तातडीने काम चालू करावे; पण जनतेची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.’’
४. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिक येथे डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ प्रसंगी नाशिक कुंभपर्वाच्या अनुषंगाने ‘ब्रँडिंग’ (प्रसिद्धी) करण्याचे सूचित केले.
५. पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘नाशिक कुंभपर्वाचे नियोजन ३ टप्प्यांत करावे’, असे या वेळी सूचित केले.
६. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘राज्यशासनाच्या वतीने २०० नवीन बसगाड्या महामंडळास उपलब्ध व्हाव्यात. या बसगाड्या कुंभमेळ्यानंतर राज्यात उपयोगी पडतील’, असे सांगितले.
७. कुंभपर्व प्राधिकरणाचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभपर्व प्राधिकरणाच्या, तसेच इतर विभागांच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी सादरीकरण केले.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !