‘मोदीज् मिशन’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !

‘मोदीज् मिशन’ पुस्तकाचे मुखपृष्ठ

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक अधिवक्ते बर्जिस देसाई यांनी लिहिले आहे. ‘रूपा पब्लिकेशन्स’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास रेखाटण्यात आला आहे. वडनगरमधील बालपण ते पंतप्रधान होण्यापर्यंतची कहाणी या पुस्तकात आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ ऑक्टोबरला या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पत्रकार सहसा लोकांविषयी चांगले लिहीत नाहीत आणि वकील पुराव्याविना लिहीत नाहीत; मात्र हे दोन्ही अंग असलेल्या व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक आहे, त्यामुळे हे पुस्तक इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देसाई यांनी पंतप्रधान मोदी यांचे विविध पैलू उलगडले आहेत. वयाच्या ९ व्या वर्षी कौटुंबिक परिस्थितीची जाणीव असणे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आधी ‘रामकृष्ण मिशन’ मग हिमालय आणि मग संघ असा त्यांनी प्रवास केला. देशाची सेवा करायची असेल, तर संन्यास न घेता संन्यस्त राहून सेवा करायचे ठरवले आणि संघाचे काम चालू केले. मोदी सक्रीय राजकारणात कसे आले? याचाही या पुस्तकात उल्लेख आहे.

राज्यपाल आचार्य देवव्रत या पुस्तकाबद्दल बोलतांना म्हणाले की, जन्म आणि मृत्यू या कालावधीत जो लोकांना समर्पित होतो, त्याचे आयुष्य सार्थकी लागते. पंतप्रधान मोदी यांनी जे आदर्श आपल्या आयुष्यात स्थापित केलेत, त्याचा विचार केला तर लक्षात येईल ही गोष्ट सहज सोपी नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आयुष्य म्हणजे एका महापुरुषाचे लक्षण आहे. नवे रस्ते बनवून लोकांना त्या मार्गावर चालण्याची क्षमता असलेले व्यक्तिमत्त्व महापुरुषांचे असते.