(म्हणे) ‘चित्रपटाचे नाव पालटायला नको होते !’ – महेश मांजरेकर

  • हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर चित्रपटाचे ‘मनाचे श्लोक’ हे नाव पालटल्याचे प्रकरण

  • असंवेदनशील चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचे उद्दाम वक्तव्य !

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर

मुंबई –  मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी मृण्मयीची (‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाची दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांची) साथ देत या वादाला विरोध केला होता; परंतु मृण्मयीने लगेच माघार घेत चित्रपटाचे नाव पालटण्याचा निर्णय घेतला. ‘मनाचे श्लोक’ ही ‘मनवा’ आणि ‘श्लोक’ या व्यक्तीरेखांची गोष्ट होती. त्यांनी त्यावर ठाम रहायला पाहिजे होते. चित्रपटाचे नाव पालटायला नको होते. ‘शिक्षणाच्या आयचा घो’ या चित्रपटाच्या वेळी मी अजिबात नाव पालटणार नाही’, असे मी स्पष्ट केले होते; कारण यामुळे समोरच्यांना आणखी प्रोत्साहन मिळते की, यांच्यावर आक्रमण केले की, हे नाव पालटतील, असे उद्दाम वक्तव्य अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले. यातून  धर्म, अध्यात्म, संस्कृती आणि समर्थ रामदासस्वामी यांच्याविषयीची त्यांची असंवेदनशीलता दिसून आली. ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील वक्तव्य केले.
‘तू बोल ना’ या नवीन नावाने हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे.

संपादकीय भूमिका

जर समर्थ रामदासस्वामींच्या पवित्र ‘मनाच्या श्लोकां’शी या चित्रपटाचा काही संबंधच नव्हता, तर हे नाव का दिले होते ? संयम आणि नीतीमत्ता शिकवणारे मनाचे श्लोक आणि विवाहबाह्य संबंधांना प्रोत्साहन देणारा चित्रपट हे परस्परविरोधी असतांना हिंदूंच्या धार्मिक भावनांविषयी मांजरेकर यांना काहीच देणेघेणे नाही, असेच म्हणावे लागते !