India Slams Pakistan : पाकने पाकव्याप्त काश्मीरवरील नियंत्रण सोडावे !

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथील आंतरसंसदीय संघाच्या सभेत भारताने पाकला सुनावले !

भारताच्या खासदार अपराजिता सारंगी

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – पाकिस्तान सातत्याने सीमापार आतंकवादाद्वारे जम्मू-काश्मीरला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला सुनावले. येथे झालेल्या आंतरसंसदीय संघाच्या (‘इंटर पार्लियामेंट युनियन’च्या) सभेत भारताच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी पाकच्या काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्यावर प्रत्युत्तर दिले.

खासदार सारंगी यांनी सांगितले की,

१. आम्ही पाकिस्तानचा निषेध करतो, जो या आंतरराष्ट्रीय मंचावर असे राजकीय विषय उपस्थित करतो, जे या सभेच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत. त्याचा उद्देश केवळ खोटा प्रचार करणे आणि भारताची प्रतिमा मलिन करणे आहे.

२. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग आहे अन् पाकिस्तानने त्याच्या बेकायदेशीर नियंत्रणातील प्रदेश तात्काळ रिकामा करावा. जम्मू-काश्मीर भारताचा होता, आहे आणि सदैव राहील. पाकिस्तानने आता ही वस्तूस्थिती मान्य करावी.

३. पाकिस्तानने आधी आपल्या देशातील स्थिती सुधारणे आवश्यक आहे, जिथे मानवी हक्कांचे उल्लंघन आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार सतत होत आहेत.

४. पाकिस्तान वारंवार भारतावर खोटे आरोप करतो; परंतु खरी गोष्ट ही आहे की, सीमापार आतंकवाद पसरवण्याचे मूळ त्याच देशात आहे. भारत आतंकवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेईल आणि याविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

५. भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे; कारण पाकिस्तान सातत्याने सीमापार आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे. आतंकवाद आणि संवाद हे एकत्र चालू शकत नाहीत.