बीड येथे आमरण उपोषणास प्रारंभ !

मद्याच्या दुकानांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांची नावे वापरल्याचे प्रकरण

उपोषणाला बसलेले हिंदुत्वनिष्ठ आणि ग्रामस्थ

बीड, २० ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांची नावे मद्याच्या दुकानांना देण्यात येत असल्याचा निषेध नोंदवत संग्राम अक्षय ढोले पाटील (रा. घुमेगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी येथील घुमेगाव, ता. गेवराई येथे १७ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण चालू केले आहे. मागण्या अद्याप मान्य न झाल्याने उपोषण अजूनही चालू आहे. मद्याच्या दुकानांची नावे पालटण्याच्या संदर्भात संग्राम अक्षय ढोले पाटील यांनी बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गड-दुर्ग हे स्वराज्याच्या इतिहासाचे प्रतीक आहेत; परंतु आज राज्यभरात मद्याची दुकान, बार यांना या पवित्र गड-दुर्गांची नावे देऊन त्यांचा अपमान केला जात आहे. हे शिवभक्तांच्या भावना दुखावणारे असून तातडीने या नावांमध्ये पालट करावा. या मागणीसाठी यापूर्वी अनेक वेळा शांततामय उपोषणे आणि आंदोलने करण्यात आली असूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली; मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. (छत्रपतींचे गड-दुर्ग हे स्वराज्य, शौर्य आणि अभिमान यांचे प्रतीक आहेत. अशा पवित्र स्थळांची नावे मद्याच्या दुकानांना देणे, हा इतिहास आणि श्रद्धा यांचा अवमान आहे. याविरोधात प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

असे उपोषण का करावे लागते ? पोलीस आणि स्वत:हून प्रशासन कारवाई का करत नाहीत ?