अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे आतापासूनच नियोजन करणार ! – कृषीमंत्री

दत्तात्रय भरणे (कृषीमंत्री)

मुंबई / पुणे – ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांसाठी रब्बी हंगाम महत्त्वाचा आहे. सध्या धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकर्‍यांना या वर्षी पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही; म्हणून यंदा रब्बी पिकाखालचे क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील रब्बी हंगामाचे नियोजन अधिक सक्षम करून शेतकर्‍यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत. रब्बी हंगामाची पूर्वसिद्धता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.