Ecuadorian President Daniel Noboa : इक्वेडोर देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर ५०० नागरिकांकडून आक्रमण !

इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ (डावीकडे)

क्यूटो (इक्वेडोर) – दक्षिण अमेरिकी देश असलेल्या इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांच्या वाहनावर ५०० हून अधिक लोकांनी आक्रमण केले. या वेळी आक्रमणकार्‍यांनी राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यावर दगडफेक केली, तसेच त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडल्या. नोबोआ यांना यात कुठलीही इजा झाली नाही. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रपती कार्यालयाने घोषित केले की, सर्व संशयितांवर आतंकवाद आणि हत्येचा प्रयत्न केल्यावरून खटला चालवला जाईल.

हे आहे आक्रमणामागील कारण !

राष्ट्राध्यक्ष नोबोआ यांनी इक्वेडोरमध्ये इंधन अनुदान बंद करण्याचा निर्णय इतक्यातच घेतला. या निर्णयाच्या विरोधात आदिवासी संघटना आणि लहान शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. काही समाजसेवी संघटनांनी गेल्या २ आठवड्यांपासून राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, अनुदान बंद केल्यावरून प्रतिवर्षी अनुमाने १.१ अब्ज डॉलर्सची (साधारण ८ सहस्र कोटी रुपयांची) बचत होईल. ही लहान शेतकरी आणि वाहतूक कामगार यांना भरपाई देण्यासाठी वापरली जाईल. दुसरीकडे आदिवासी संघटना आणि लहान शेतकरी म्हणत आहेत की, डिझेलच्या किमती वाढल्याने शेती अन् वाहतूक यांचा खर्च वाढेल. याचा सर्वाधिक भार गरीब आणि ग्रामीण समुदायांवर पडेल, तर श्रीमंत अन् मोठे उद्योग त्याचे परिणाम सहजपणे सहन करतील. अनुदान रहित करण्याच्या निषेधार्थ चालू झालेल्या हिंसक निदर्शनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अनेक भागात आणीबाणी लागू केली आहे.