हिंदूंना तालिबानी म्हणणार्‍या आधुनिक वैद्यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या आक्रमक पवित्र्यानंतर क्षमा मागितली !

मंदिरात महिलेने तोकडे कपडे परिधान केल्याने प्रवेश नाकारल्याच्या वृत्ताचे प्रकरण

जयसिंगपूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी एकत्र जमलेले हिंदुत्वनिष्ठ

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर), ७ ऑक्टोबर – एका महिलेने मंदिरात प्रवेश करतांना तोकडे कपडे घातल्याने वस्त्रसंहितेचा (मंदिरात कपडे परिधान करण्याविषयीचे नियम) भंग होत असल्याचे लक्षात आल्यवर ही गोष्ट मंदिरातील पुजार्‍यांनी बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांना लक्षात आणून दिली. यानंतर पोलिसांनी महिलेला प्रवेश नाकारला, या आयशाचे वृत्त एका प्रसिद्धीमाध्यमाने दिले होते.

या संदर्भात डॉ. अजित बिरनाळे यांनी त्यांच्या फेसबुकवर ‘हिंदु तालिबानी, ऋषि वगैरे उघडे असतात, ते चालायचे का ?’, अशी प्रतिक्रिया दिली होती. या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन डॉ. बिरनाळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षकांनी डॉ. बिरनाळे यांना बोलावले. हिंदुत्वनिष्ठांनी त्यांना खडसावल्यानंतर डॉ. बिरनाळे यांनी चूक मान्य करत क्षमा मागितली आणि फेसबुक पोस्ट (लिखाण) नष्ट केले.

या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेंद्रसिंग रजपूत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे, भाजपचे श्री. सुनील ताडे, व्यापारी संघटनेचे श्री. निर्मल पोरवाल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजू गाडीवडार, सकल हिंदु समाजाचे श्री. अजित पवार, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. संजय घाटगे यांसह अन्य उपस्थित हाेते.