जळगाव येथे रणरागिणी शस्त्रपूजनास उत्स्फूर्त प्रतिसाद !

  • योगा नृत्य आणि शौर्य प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष !

  • ९ रणरागिणींनी केले शस्त्रपूजन !

आमदार सुरेशमामा भोळे यांना निवेदन देतांना रणरागिणी

जळगाव – महाराष्ट्र, तसेच संपूर्ण देशात स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्याला शाळकरी मुलीही अपवाद राहिलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, हिंदु जनजागृती समिती आणि ‘गोदावरी फाऊंडेशन’ यांनी संयुक्तपणे रणरागिणी शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शहरातील कामिनी धांडे, सरिता खाचणे, डॉ. दीपिका मनीष चौधरी, विधीज्ञ अनुराधा वाणी, पद्मजा अत्रे, साधना दामले, डॉ. रेखा महाजन, मंगला बारी आदी रणरागिणींनी शस्त्रपूजन केले.

या कार्यक्रमाला सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली. भाजपच्या खासदार स्मिता वाघ, माजी महापौर सीमा भोळे, भाजपच्या अधिवक्त्या शुचिता हाडा, दीपमाला काळे, उज्जवला बेंडाळे, रेखा वर्मा, तसेच राधा कोल्हे, डॉ. अर्पणा भट, मनीषा पाटील, नेहा जोशी आदी शहरातील विविध भागांतील, विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या शेकडो रणरागिणी या वेळी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचा मूळ उद्देश ‘महिलांना धैर्य देऊन त्यांना स्वसंरक्षणासाठी प्रेरित करणे, त्या दुर्गेचे रूप आहेत आणि देवीच्या हातात दांडिया नसून शस्त्र आहे’, याविषयी जागृती निर्माण करण्ो हा होता. या वेळी रणरागिणींनी दंडसाखळी, लाठीकाठी, यांसारखी स्वसंरक्षण करणारी प्रात्यक्षिके सादर केली. तसेच ज्ञानयोग केंद्राच्या हेतल पिपरिया आणि त्यांच्या सहकारी रणरागिणी यांनी वैशिष्ट्यपूर्ण असे योग नृत्य सादर करून देवीला मानवंदना दिली.

आमदार भोळे यांना लव्ह जिहादविरोधी कायद्याचे निवेदन !

या वेळी कार्यक्रमाला आलेले भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना रणरागिणी यांनी लव्ह जिहादविरोधी कायद्याची मागणी करणारे निवेदन दिले, तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा पारित करावा, अशी मागणी सर्वांनी या वेळी आमदार भोळे यांच्याकडे केली.

यावर ‘हिवाळी अधिवेशनात हा कायदा करण्याविषयी मुख्यमंत्र्यांना नक्की सांगेन’, असा शब्द आमदार भोळे यांनी सर्व रणरागिणींना दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कु. कृतिका कुलकर्णी यांनी केले, तर कु. गौरी कुलकर्णी यांनी श्लोकाद्वारे देवीला वंदना केली. सनातन संस्थेच्या सौ. सुवर्णा साळुंखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. काही रणरागिणींनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले.

यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे समन्वयक सूरज दायमा, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, सुजय चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे गजानन तांबट, अधिवक्ता निरंजन चौधरी, माधव सावलानी इत्यादींचे सहकार्य लाभले, तसेच महामंडळाचे सचिन नारळे, गोदावरी फाऊंडेशनच्या आधुनिक वैद्या केतकी पाटील आणि समितीचे प्रशांत जुवेकर यांचे या कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन लाभले.

शस्त्रपूजन करतांना वस्त्रोद्योगमंत्री श्री. संजय सावकारे

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम उत्तर महाराष्ट्रात १७ ठिकाणी शस्त्रपूजन !

जळगाव, धुळे आणि नंदुरबार या भागांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ ठिकाणी शस्त्रपूजन उत्साहात पार पडले. याला युवा वर्गाचा भरभरून प्रतिसाद होता. जवळपास ४ सहस्र ५०० जणांनी या शस्त्रपूजनाचा लाभ घेतला.

भुसावळ – येथे राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री श्री. संजय सावकारे यांच्या हस्ते शस्त्रपूजन पार पडले. धरणगाव तालुक्यात पाळधी येथे झालेल्या शस्त्रपूजनास विविध गावांतून युवा वर्ग आला होता. सायंकाळी त्यांनी त्यांच्या गावांत शस्त्रपूजन केले. चोपडा, धुळे, नंदुरबार येथेही उत्साहात शस्त्रपूजन पार पडले.