पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे विवाह संपुष्टात आला, तर पत्नी भरपाई मागू शकते ! – Delhi High Court

नवी देहली – एखाद्या महिलेच्या पतीचे दुसर्‍या महिलेशी विवाहबाह्य संबंध असतील आणि त्याच्या ताणतणावातून दोघांचे लग्न मोडले असेल, तर पत्नी त्या महिलेविरुद्ध दिवाणी न्यायालयात खटला प्रविष्ट (दाखल) करू शकते, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, विवाह हे एक पवित्र बंधन आहे. या नात्यात हस्तक्षेप करणारा कोणताही तृतीय पक्ष मानसिक किंवा भावनिक हानीसाठी उत्तरदायी धरला जाऊ शकतो. अशा स्थितीत भविष्याचा विचार करून तो त्यासाठी भरपाईसाठी दावा करू शकतो.

काय आहे प्रकरण ?

पीडित महिलेने सांगितले की, तिचे लग्न वर्ष २०१२ मध्ये झाले होते. वर्ष २०१८ मध्ये त्यांना जुळी मुले झाली; परंतु वर्ष २०२१ मध्ये एक महिला तिच्या पतीच्या व्यवसायात सहभागी झाली आणि दोघे जवळ आले. तिचा पती त्या महिलेसमवेत  कामासाठी प्रवास करू लागला. सार्वजनिक ठिकाणी ते एकत्र फिरू लागले. प्रकरण वाढत गेल्याने पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज प्रविष्ट (दाखल) केला.

न्यायालयाने स्पष्ट केले की, सदर प्रकरणात हा खटला पतीविरुद्ध नाही, तर पतीच्या प्रेयसीविरुद्ध आहे. त्यामुळे त्याची सुनावणी कौटुंबिक न्यायालयात नाही, तर दिवाणी न्यायालयात होईल. विवाह मोडण्याचे कारण ती महिला होती कि नाही हे खटल्यात निश्चित केले जाईल. सकृतदर्शनी हा खटला चालवण्यायोग्य मानला गेला आहे. कारण त्यासंदर्भात पीडित महिलेने सबळ पुरावे सादर केले.