गजानन भास्कर मेहेंदळे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर ते स्वतःच एक संस्था आहेत ! सरांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. केवळ इतिहासाच्या अभ्यासाला आयुष्य वाहिलेली माणसे पुण्यात बरीच होऊन गेली. या उज्ज्वल ज्ञानपरंपरेचे मेहेंदळेसर हे शेवटचे पाईक ! गजानन मेहेंदळे यांचे १७ सप्टेंबर या दिवशी निधन झाले.

१. ‘युद्धपत्रकार’ म्हणून काम !
मेहेंदळेसर इतिहासकार म्हणून आज सर्वांनाच माहिती आहेत; पण पुष्कळ अल्प लोकांना हे ठाऊक आहे की, ते ‘मिलिटरी स्ट्रॅटेजी’ (लष्करी धोरणे) या विषयाचे जाणकार आहेत. सरांनी ‘संरक्षणशास्त्र’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे आणि इतकेच नाही, तर वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी ‘युद्धपत्रकार’ म्हणून काम केले आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर, म्हणजे तत्कालीन पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानच्या सीमांवर जाऊन त्यांनी बांगलादेश युद्ध जवळून बघितलेले आहे. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाचाही त्यांचा प्रगाढ अभ्यास आहे.
२. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि ग्रंथकार
पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात जाऊन त्यांनी शिवकालीन कागदपत्रांचा अभ्यास केला. अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे वाचण्यासाठी ते मोडी लिपी, तसेच फारसी, उर्दू आणि थोडी पोर्तुगीज भाषा शिकले. सतत ३० वर्षे अभ्यास करून स्वतः अनेक प्राथमिक साधने पडताळून मेहेंदळेसरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर २ ग्रंथराज लिहिले, ‘श्री राजा शिवछत्रपती’ हा मराठी ग्रंथ आणि ‘शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स’ हा इंग्रजी ग्रंथ हे दोन्हीही ग्रंथ आज अस्तित्वात असलेले शिवचरित्रावरचे सर्वोत्तम ग्रंथ मानले जातात.

३. मेहंदळेसरांसह व्यतीत केलेली सुंदर आणि संस्मरणीय संध्याकाळ !
सरांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनाच्या निमित्ताने आम्ही काही जण त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. हिंदु संस्कृतीनुसार सरांचे औक्षण करून त्यांचे अभिष्टचिंतन केले, त्यांचे आशीर्वाद घेतले. सरांचे घर म्हणजे एका ज्ञानयोग्याचा आश्रम, ब्रह्मचार्याची मठी. सगळीकडे पुस्तके आणि कागदपत्रे पसरलेली अन् मधोमध सरांचे ‘डेस्क’ (टेबल). सर या वयातही संपूर्ण वेळ कामात मग्न असतात. आम्ही सर्व अगदी ‘आपल्या ज्ञानसाधनेत व्यत्यय तर आणत नाही ना ?’, असा प्रश्न विचारणार्या व्यक्तीच्या भूमिकेतून जरा दबकतच सरांच्या भेटीला गेलो होतो; पण सरांनी आम्हाला तब्बल साडेतीन तास दिले.
सर अखंड बोलत होते संदर्भ देऊन, नावे घेऊन आणि आम्ही नुसते ऐकत होतो. कितीतरी विषयांवर गप्पा झाल्या, सरांचे येऊ घातलेले नवीन पुस्तक, भारतात इस्लामी आक्रमकांनी केलेला हिंदूंचा धर्मच्छळ, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आभाळाएवढे कर्तृत्व, त्यांचा शत्रूबोध, टिपू सुलतानाचे क्रौर्य, मोडलेली मंदिरे, इस्लामी आणि मार्क्सिस्ट (साम्यवादी) इतिहासकारांनी जाणूनबुजून केलेला सत्याचा अपलाप, त्यामागची कारणे, अनेक विषय, एकातून एक असे निघत जाणारे, त्यावर सरांच्या वक्तृत्वाचा गंगौघ, मधूनच डोकावणारा त्यांचा मिश्किलपणा, सहज सुचलेल्या उपमा उत्प्रेक्षा, आमच्या कधीकधी मूर्ख भासू शकणार्या प्रश्नांनाही न कंटाळता त्यांनी दिलेली उत्तरे आणि अत्यंत आपुलकीने केलेले आमचे स्वागत. फार सुंदर आणि संस्मरणीय संध्याकाळ होती ती.
एक समर्पित, व्रतस्थ, निःस्पृह आयुष्य कसे असते, हे आम्हाला जवळून बघायला मिळाले, हे आमचे सौभाग्य ! सरांना वाढदिवसाची भेट म्हणून छोटीशी चांदीची छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती दिली. शिवचरित्राच्या या डोळस अभ्यासकाला त्याहून अधिक समर्पक भेट दुसरी कुठली असूच कशी शकते ?
– शेफाली वैद्य, हिंदुत्वनिष्ठ लेखिका, पुणे. (१८.९.२०२५)
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !