प्रतीक्षा काकस्पर्शाची…!

पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील महत्त्वाचा विधी असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर लिंगदेहाला सद्गती मिळावी; म्हणून पितृपक्षात श्राद्ध करणे, हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी भाद्रपद मासातील कृष्णपक्षात ‘महालय श्राद्ध’ केले जाते. हिंदु धर्मात या कालावधीत पितरांसाठी श्राद्धविधी करण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्राद्धाच्या वेळी पितरांना अर्पण केलेले अन्न कावळे ग्रहण करतात. कावळ्याने अन्न ग्रहण करणे, याला ‘काकस्पर्श’ म्हणतात. काकस्पर्श झाल्यास अर्पण केलेले अन्न पितरांपर्यंत पोचल्याचे मानले जाते. सद्य:स्थिती पहाता श्राद्धविधीच्या वेळी पितरांसाठी ठेवलेले अन्न ग्रहण करण्यास कावळे येत नाहीत अथवा पुष्कळ वेळ वाट पहावी लागते. काही िठकाणी तर मनाच्या समाधानासाठी ‘अन्नाला कावळा शिवावा’ म्हणून जाणूनबुजून कावळा पकडून आणल्याच्या घटनाही ऐकिवात आहेत ! याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. आज समाजात बहुतांश जणांकडून पितृपक्षातील श्राद्धविधीची खिल्ली उडवली जाते. पितृपक्षाविषयी अनेक विनोद सामाजिक माध्यमांद्वारे पसरवले जातात. प्रत्यक्षात हिंदु धर्माप्रमाणे अन्य धर्मियांतही मृत्यूनंतर पूर्वजांच्या तृप्तीसाठी काहीना काही कृती केल्या जातात. त्यामुळे अशा प्रकारे विनोद करून हिंदु धर्मातील पवित्र संस्कृतीचा अपमान करणे अयोग्य आहे.

श्राद्धविधीकडे होणारे दुर्लक्ष, त्याविषयीचे अपसमज, अयोग्य पद्धतीने होणारे श्राद्धविधी किंवा त्यातील चुका यांमुळे सध्या समाजात श्राद्धविधीची फलनिष्पत्ती मिळण्याचे प्रमाण अल्प आहे. ‘श्राद्धविधी करायला ब्राह्मण मिळत नाहीत’ म्हणून काही ठिकाणी श्राद्धविधी करणेच टाळले जाते. भगवद्गीतेत श्राद्धाचे महत्त्व सांगितले आहे. देवाण-घेवाण हिशोब पूर्ण करण्यासाठी मनुष्यजन्म असतो. एखाद्या व्यक्तीशी असलेला देवाणघेवाण हिशोब श्राद्ध केल्याने पूर्ण होतो.

शहरे म्हणजे इमारतींची जंगले झाली आहेत. विजेच्या तारांची वावटळेही सर्वत्र असतात. अशा प्रकारच्या शहरीकरणामुळे आणि नैसर्गिक अधिवास अल्प झाल्याने कावळ्यांची संख्या न्यून झाल्याचे वास्तव आहेच. कित्येकदा कावळे दिसलेच, तर ते कचरा पडलेल्या ठिकाणी आढळतात. पिंडाला कावळा शिवण्याचे शास्त्र आणि अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच; परंतु काही वेळा शहरात कावळे न दिसल्याने अडचण येऊ शकते. त्यामुळे ‘श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध !’, असे शास्त्रात सांगितले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘केवळ अंतःस्थ तळमळीने, भावपूर्ण प्रार्थना केल्यासही त्याला श्राद्धाचे फळ मिळते’, असे शास्त्र सांगते. त्यामुळे श्रद्धेने श्राद्धविधी करणे श्रेयस्कर आहे !

–  श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.