धार्मिक कृतीच्या प्रारंभी संकल्प आणि शेवटी तिचे फळ ईश्वराला अर्पण करण्याचे महत्त्व ! 

१. धार्मिक कृती करतांना संकल्प करण्याचे महत्त्व !

सङ्कल्पं च यथा कुर्यात् स्नानदानव्रतादिके ।
अन्यथा पुण्यकर्माणि निष्फलानि भवन्ति च ।।

– आचारमयूख, परिभाषाप्रकरण

अर्थ : स्नान, दान, व्रत इत्यादी कोणतेही सत्कर्म करतांना संकल्प करावा, अन्यथा (ती) पुण्यकर्मे निष्फळ होतात.

‘दैनंदिन जीवनात आपण देवपूजा, उपवास, स्नान, अशा अनेक धार्मिक कृती सहज करत असतो. त्यांपैकी कित्येक कृती पूर्वी लोक करत होते; म्हणून आपणही त्याचप्रमाणे करतो; मात्र ‘या कृती आपण कशासाठी करतो ? त्या करण्याचे उद्देश काय ?’, हे आपण लक्षात घेत नाही.

श्री. अमर जोशी

१ अ. देवपूजा करतांना करायचा संकल्प : पूर्वी दैनंदिन देवपूजा करतांनासुद्धा विधीवत आचमन इत्यादी करून ‘माझ्या संपूर्ण कुटुंबातील (त्यामध्ये पाळीव पशू-पक्षी इत्यादी सर्वांचा समावेश होतो.) सर्वांना आयुष्य, आरोग्य इत्यादी प्राप्त होऊन त्या सर्वांचा संपूर्ण उत्कर्ष व्हावा आणि तुम्हा देवतांची माझ्या कुटुंबावर संपूर्ण कृपा रहावी’, यासाठी मी ही देवपूजा करत आहे’, असा संकल्प करून पूजा केली जात असे.

१ आ. स्नान करतांना करायचा संकल्प : स्नान करतांना ‘माझे शरीर, वाणी आणि मन यांद्वारे झालेले सर्व पाप, तसेच एखाद्या पापी मनुष्याच्या संपर्कात आल्याने लागलेले पाप यांचे क्षालन होण्यासाठी मी गंगास्मरणपूर्वक स्नान करतो’, असा संकल्प करायला सांगितले आहे. (येथे सत्संगाचे महत्त्व लक्षात येते. पापी मनुष्याच्या संपर्काने जे पाप लागते, त्याचाही विचार शास्त्रकारांनी केला आहे.)

उदाहरण म्हणून वरील धार्मिक कृती येथे दिल्या आहेत. ‘दैनंदिन केल्या जाणार्‍या प्रत्येक धार्मिक कृतीपूर्वी ‘संकल्प करणे’, ही कृती शास्त्रकारांना अपेक्षित आहे. अन्यथा त्या कृती निष्फळ होतात’, असे त्यांचे सांगणे आहे.

१ इ. सध्या विधीवत संकल्प करणे शक्य होत नसल्याने धार्मिक कृती करण्यापूर्वी तिचा उद्देश देवाला निवेदन करावा ! : कालौघात वरीलप्रमाणे विधीवत संकल्प इत्यादी करणे अनेकांना शक्य होत नाही; परंतु आपण करत असलेल्या धार्मिक कृतीचा उद्देश आपापल्या शब्दांत तरी देवाला निवेदन करावा आणि नंतर ती कृती करावी. त्यामुळे त्या कृतीचे शास्त्रात सांगितलेले सर्व लाभ आपल्याला मिळतात.

१ इ १. धार्मिक कृतीचा उद्देश निवेदन केल्याने होणारे लाभ !

अ. आपल्याला त्या कृतीचे शास्त्रात सांगितलेले लाभ मिळतील.

आ. त्या कृतीचा उद्देश मानसशास्त्रानुसार आधी आपल्या मनावर बिंबवला जाईल आणि ‘ती आपण कशासाठी करत आहोत ?’, हे कळल्याने ती कृती गांभीर्याने केली जाईल.

इ. त्या कृतीचा विशिष्ट उद्देश कळल्याने दैनंदिन जीवनातही पालट होतील. त्याची उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. नियमित स्नान करतांना ‘पापी व्यक्तीच्या संपर्कातून लागलेल्या पापाचे क्षालन होऊ दे’, असे म्हणून स्नान केल्यास सत्संगात रहाण्याचे महत्त्व आपल्या मनावर आपोआप बिंबेल.

२. देवपूजा करतांना ‘घरातील सर्वांचा उत्कर्ष होऊ दे’, असे म्हणून पूजा केल्यावर कुटुंबातील सर्वांमध्ये एकोपा निर्माण होईल.

२. धार्मिक कृतीचे फळ ईश्वराला अर्पण करणे

अ. धार्मिक कृती करण्यापूर्वी संकल्प करावा; मात्र कृती झाल्यावर ‘ही कृती आम्ही केवळ ईश्वराला अर्पण करण्यासाठीच केली आहे’, या आध्यात्मिक भावाने ती ईश्वराला तात्काळ अर्पण करावी.

आ. या संदर्भात श्रीमद्भगवद्गीतेत भगवंताने अर्जुनाला २ सूत्रे संगितली आहेत.

१. तू केवळ कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नकोस.

२.

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक २७

अर्थ : हे कौन्तेया (म्हणजे कुंतीपुत्र अर्जुना), तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर.

इ. फळाची अपेक्षा न ठेवता ते ईश्वराला अर्पण करण्याचे महत्त्व कूर्मपुराणातही सांगितले आहे.

ब्रह्मण्याधाय कर्माणि निःसङ्गः कामवर्जितः ।
प्रसन्नेनैव मनसा कुर्वाणो याति तत्पदम् ।।

– कूर्मपुराण, पूर्वभाग, अध्याय ३, श्लोक १४

अर्थ : जो सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती अन् वासना सोडून प्रसन्न मनाने करतो, तो ब्रह्मपदाला पोचतो.

तात्पर्य काय, तर धार्मिक कृती करण्यापूर्वी ‘आपण ती कोणत्या उद्देशाने करत आहोत ?’, हे देवाला निवेदन करावे आणि ती अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न करावा. कृती झाल्यावर फळाचा विचार न करता ते तात्काळ ईश्वराला अर्पण करावे. ‘कोणतीही कृती करण्यापूर्वी ईश्वराला प्रार्थना करणे आणि कृतीच्या शेवटी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे’, हे याचेच एक प्रातिनिधिक रूप आहे.’

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा, गोवा. (२१.४.२०२५)

वाचकांना नम्र विनंती !

वाचकांना याविषयी काही शंका असल्यास किंवा अन्य प्रमाणभूत ग्रंथांचे संदर्भ ठाऊक असल्यास ८१८०९६८६६० या क्रमांकावर व्हॉट्स ॲप मेसेजद्वारे संपर्क करावा.