भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सातारा जिल्ह्यातील क्रांतीकारकांचे योगदान मोलाचे ! – राष्ट्रभक्त सातारावासीय

प्रतिकात्मक चित्र

सातारा, ११ सप्टेंबर (वार्ता.) – १८५७ चे स्वातंत्र्यसमर चालू झाल्यापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत क्रांतीकारकांनी असीम त्याग आणि बलीदान केले. या स्वातंत्र्यलढ्यात सातारा जिल्ह्यातील क्रांतीकारकांचे योगदान मोलाचे आहे, असे मनोगत शहरातील राष्ट्रभक्त नागरिकांनी व्यक्त केले.

शहरातील राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने ‘फाशीचा वड’ या ठिकाणी १६८ व्या क्रांतीदिनानिमित्त ‘हुतात्म्यांना अभिवादन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थित राष्ट्रभक्त नागरिकांनी मनोगत व्यक्त केले. वर्ष १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध देशामध्ये असंतोष उफाळून आला होता. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी संपूर्ण भारत एक झाला होता. यामध्ये सातारा येथील क्रांतीकारकांनीही स्वत:चे मोलाचे योगदान दिले. त्या वेळी जिल्ह्यातील १७ क्रांतीकारकांना इंग्रजांनी राजद्रोहाच्या खटल्यात दोषी ठरवले होते. त्यानुसार संबंधित १७ जणांना फाशीचा वड येथे शिक्षा देण्यात आली होती. यातील ६ जणांना फाशी देण्यात आली, ४ जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आले, तर उर्वरित ७ जणांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या उठावात सहभागी झाल्यामुळे इंग्रजांनी क्रांतीकारकांची मालमत्ता शासनाधीन केली होती; मात्र भारताला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे होत आली, तरीही या महान हुतात्मा क्रांतीकारकांचे वारसदार न्यायाच्या प्रतीक्षेत तिष्ठत आहेत. (याकडे प्रशासन कधी लक्ष देणार ? स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांच्या नातेवाइकांविषयी संवेदनशीलता का नाही ? – संपादक)