‘कितीही कठीण प्रसंग आला, तरी गुरुदेवच आपल्याला सांभाळतात’, याची अनुभूती घेणार्‍या सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील !

सद्गुरु अनुराधा वाडेकर

१. आईला कर्करोग झाल्याचे कळल्यावर मनात नकारात्मकता निर्माण होऊन काळजीचे विचार वाढणे आणि साधकांनी प्रेमाने विचारपूस अन् साहाय्य केल्यावर मन सकारात्मक होणे 

‘२४.५.२०२५ या दिवशी माझ्या आईला कर्करोग झाला असल्याचे निदान झाले. तिच्या वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर कर्करोग शरिरात पुष्कळ पसरला असल्याचे समजले. त्यामुळे माझ्या मनात थोडी नकारात्मकता निर्माण झाली आणि मनातील काळजीचे विचार वाढले.

५.६.२०२५ या दिवशी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि त्यांच्या समवेत अन्य साधक माझ्या घरी मला भेटायला आले होते. त्या वेळी अभयदादांनी आईच्या सर्व वैद्यकीय तपासण्यांची माहिती घेतली. त्यानंतर अभयदादांनी मिरज येथील ‘सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल’च्या विश्वस्तांशी बोलून त्यांना मला सर्वतोपरी साहाय्य करण्यास सांगितले, तसेच मला पुणे येथील कर्करोगावरील आयुर्वेदीय उपचार करणार्‍यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक देऊन त्या उपचारांविषयी सुचवले.

साधक घरी येऊन गेल्यानंतर माझ्या मनाची स्थिती आणि घरातील वातावरण यांत पुष्कळ सकारात्मक पालट झाला. आईची पहिली ‘किमोथेरपी’ (टीप) झाल्यानंतर लगेचच ११.६.२०२५ या दिवसापासून मला सेवेसाठी कोल्हापूर, सातारा, पुणे आणि मुंबई येथे जाता आले.

टीप – किमोथेरपी : कर्करोगावरील औषधप्रणाली

२. आईसाठी नामजप विचारण्याच्या संदर्भात झालेली विचारप्रक्रिया आणि आलेली अनुभूती 

२ अ. झालेली विचारप्रक्रिया 

१. साधकांनी मला उत्तरदायी साधकांना आईसाठी नामजपादी उपाय विचारण्यास सांगितले होते; पण ‘आई नामजप करणार नाही’, असा विचार करून मी नामजप विचारला नाही.

अधिवक्त्या प्रीती पाटील

२. पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णीकाका (सनातनचे ९८ वे संत, वय ६६ वर्षे) यांनी भ्रमणभाषवरून माझ्या आईची विचारपूस केली. त्यांनीही मला नामजपादी उपाय विचारण्यास सांगितले. नंतर संतांचे आज्ञापालन करायचे; म्हणून मी आईला सनातनच्या ‘विकार-निर्मूलनासाठी नामजप’, या ग्रंथातील कर्करोगाच्या संदर्भातील ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप करण्यास सांगितला.

२ आ. मुंबईला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या झालेल्या १५ मिनिटांच्या भेटीत त्यांनी साधिकेच्या आईसाठी नामजपादी उपाय सांगणे : १३.६.२०२५ या दिवशी मी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या समवेत मुंबईला गेले. त्या वेळी मी पोचल्यानंतर १० मिनिटांतच सद्गुरु अनुराधा वाडेकर या १५ मिनिटांसाठी तेथे आल्या. त्यांच्या गाडीत साहित्य भरायचे होते. तेवढ्या कालावधीसाठी त्या आल्या होत्या. त्या वेळी माझी त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी माझ्या घरची विचारपूस केल्यानंतर आईला कर्करोग झाल्याचे मी त्यांना सांगितले. त्यांनीही मला नामजपाविषयी विचारले. त्या वेळी मी त्यांना ‘आईसाठी नामजपादी उपाय विचारण्याच्या संदर्भात माझी झालेली विचारप्रक्रिया आणि मी आईला सनातनच्या ग्रंथातून सांगितलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप’, यांविषयी सांगितले. त्या वेळी त्यांनी स्वतः मला आईसाठी कर्करोगावर १ घंटा ‘श्री दुर्गादेव्यै नमः (३ वेळा) । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री गणेशाय नमः।’, हा नामजप आणि ‘किमोथेरपी’नंतर होणारा त्रास न्यून होण्यासाठी ‘श्री राम जय राम जय जय राम (२ वेळा)। श्री गुरुदेव दत्त । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप सांगितला. त्या मला म्हणाल्या, ‘‘आईला नामजप करायला जमले नाही, तर घरच्या कुणाला तरी तिच्यासाठी हे जप करायला सांग.’’

नंतरही त्यांनी मला काही सूत्रे सांगितली आणि पुढे त्या मला म्हणाले, ‘‘मी तुझी आठवण काढत असते.’’ ‘सद्गुरु ताई माझी आठवण काढतात’, याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या वेळी मला ‘साक्षात् गुरुदेवच मला सांभाळत आहेत आणि तेच माझ्या समवेत सतत आहेत’, याची जाणीव झाली. ‘देवच साधकांसाठी १० पावले पुढे येतो’, या विचारानेच माझी पुष्कळ भावजागृती झाली.

३. १५.६.२०२५ या दिवशी सकाळी मी सांगली येथे परत आले. त्या वेळी मला रामनाथी आश्रमातून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा प्रसाद मिळाला. 

या सर्वांमुळे माझ्या मनाची सकारात्मकता वाढली आणि ‘कितीही कठीण प्रसंग आला, तरी गुरुदेवच आपल्याला सांभाळतात’, हे मला अनुभवता आले.’

– अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली (१९.६.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक