संपादकीय : आता लढा रामसेतूचा !  

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

सर्वाेच्च न्यायालयाने ‘रामसेतू’ला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. राज्यसभेचे माजी खासदार आणि भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवरून ही नोटीस बजावण्यात आली. डॉ. स्वामी यांनी याचिकेत म्हटले, ‘केंद्र सरकार रामसेतूचे संरक्षण करण्यास बांधील आहे. रामसेतू म्हणजे तमिळनाडूतील रामेश्वरम् आणि श्रीलंकेतील मन्नार बेट यांना जोडणारा केवळ अद्वितीय चमत्कार नव्हे, तर हिंदु धर्मियांसाठीचा तो आध्यात्मिक ठेवा आहे.’

रामसेतू म्हणजे तीर्थक्षेत्र तर आहेच; पण तो हिंदूंची श्रद्धा आणि भक्ती यांचाही विषय आहे. रामसेतूला धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, भौगोलिक, राजकीय अशा सर्वच स्तरांवर महत्त्व आहे. ‘प्रभु श्रीरामाने वानरसेनेसह सेतू निर्माण केला’, अशी श्रद्धा कोट्यवधी हिंदू आणि रामभक्त यांच्या मनात आहे; पण काही वैज्ञानिकांच्या मते हा रामसेतू नसून केवळ नैसर्गिक वाळूचा बंधारा आहे, तर काही संशोधक सांगतात की, ही मानवनिर्मित रचना आहे. निवडणुकांच्या कालावधीतही रामसेतूचे सूत्र काही वेळा उपस्थित केले जाते; पण त्यामागे धार्मिक स्तरावरील ध्रुवीकरण हे कारण असते. अशा प्रकारे रामसेतूचा विषय अनेक क्षेत्रांमध्ये विभागला गेला आहे. त्रेतायुगात श्रीरामासारखा अवतार होऊन गेला आणि त्याच्या संदर्भात असंख्य पुरावे अस्तित्वात असतांना रामसेतूच्या अस्तित्वाविषयी प्रश्न किंवा शंका निर्माण होणे, हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. ‘वाल्मीकि रामायणा’मध्ये रामसेतूचे संपूर्ण वर्णन दिले आहे. वाल्मीकि हे ऋषि असल्याने त्यांचे लिखाण असत्य असूच शकत नाही. टीकाकार किंवा विज्ञानवादी यांनी रामसेतूचे अस्तित्व नाकारणे, हा एकप्रकारे रामायणाचा अवमानच करणे होय ! रामसेतूसाठी वापरलेले दगड आजही पाण्यावर तरंगतात. याचा थांगपत्ता जगभरातील मोठमोठ्या शास्त्रज्ञांना संशोधन करूनही काढता आलेला नाही, हे एकप्रकारे विज्ञानाचे अपयशच नव्हे का ?

भारतात अनेक दशके प्रलंबित असलेले श्रीराममंदिर उभारले जाऊ शकते, तर मग त्रेतायुगात लक्षावधी वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या रामसेतूच्या आध्यात्मिक किंवा दैवी स्तरावरील सत्यतेची प्रचीती कलियुगात का मिळू शकत नाही ? सर्वाेच्च न्यायालयाच्या नोटिसीनंतर आता तरी केंद्र सरकारने यात लक्ष घालायला हवे. ज्याप्रमाणे अयोध्येचा लढा चिकाटीने लढून श्रीराममंदिर उभारण्याचे प्रकरण धसास लावले, त्याप्रमाणे रामसेतूचा लढा सरकारने देऊन सर्व रामभक्तांच्या धार्मिक भावनांचा आदर करायला हवा. भारतातील हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ यांनीही जसा अयोध्येसाठी लढा दिला, तसा लढा रामसेतूसाठी देण्याची वेळ आलेली आहे, हे लक्षात ठेवून संघटित आणि कृतीशील व्हायला हवे.

सरकारची इच्छाशक्ती हवी ! 

रामसेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिल्यास त्याविषयीचा अधिकाधिक सखोल अभ्यास करता येऊ शकतो. त्यासंदर्भात आणखी मोठ्या प्रमाणात संशोधनाला चालना मिळू शकते. रामसेतूची रचना अधिकृतरित्या जतन करता येऊ शकते. समुद्रातील लाटांच्या मार्‍याने रामसेतूच्या दुभंगलेल्या दगडांची डागडुजीही करता येईल. ज्याप्रमाणे अयोध्येतील श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अजूनही भाविक अलोट गर्दी करत आहेत, त्याप्रमाणे लाखोंच्या संख्येत रामभक्त रामसेतूलाही निश्चितच भेट देत आहेत आणि भेट देतीलही. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल. रामसेतूच्या स्थळाचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळाच्या सूचीतही समावेश होऊ शकतो. ‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्प, तसेच गेल्या काही शतकांमध्ये निर्माण झालेली चक्रीवादळे यांमुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे धोके निर्माण झाले. त्यामुळे मूळ रामसेतू हा काही प्रमाणात समुद्राखाली गेलेला आढळतो. त्याचे पुनः दर्शन व्हावे, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. जर अन्य देशांमध्ये हा सेतू असता, तर तेथील सरकारने आटोकाट प्रयत्न करून त्याचे अस्तित्व टिकवण्याचा आणि जनतेला त्याचे दर्शन घडवण्याचा निश्चितच प्रयत्न केला असता. रामसेतू भारताशी निगडित असतांनाही त्याचे संशोधन करण्यात भारतीय पुरातत्व विभाग किंवा आतापर्यंतची सर्वपक्षीय सरकारे यांनी इतकी वर्षे अक्षम्य दुर्लक्ष केले. हिंदूंच्या, पर्यायाने रामभक्तांच्या धर्मभावनांचे मोल लक्षात घेऊन आतातरी त्यासाठी वेगवान पावले उचलायला हवीत.

महाराष्ट्र सरकार अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. हे स्तुत्य आहेच; पण ज्या समुद्रात रामसेतूसारख्या दैवी बांधकामाची उभारणी झालेली आहे, त्याकडे मात्र डोळेझाक केली जाणे, हे रामभक्तांसाठी अन्यायकारक आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने न्यायालयात ‘श्रीराम काल्पनिक असल्याने रामसेतू त्यांनी बांधलेला नाही’, असा दावा केला होता; पण देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यावर सरकारला हा दावा मागे घ्यावा लागला होता. केंद्र सरकारने रामसेतूच्या अस्तित्वासाठी तीव्र इच्छाशक्ती दाखवायला हवी.

ताजमहाल जर ऐतिहासिक किंवा राष्ट्रीय स्मारक होऊ शकतो, तर मग रामसेतू का नाही ? ताजमहाल केवळ एक वास्तू आहे; पण रामसेतू हा श्रीरामाने सीतेला वाचवण्यासाठी आणि रावणाच्या लंकेत जाऊन त्याचा पराभव करण्यासाठी बांधलेला होता. थोडक्यात रामसेतू हा प्रेम, त्याग, साहस आणि हनुमंतासारखे असंख्य भक्त यांची निशाणीच आहे. मग अशी निशाणी राष्ट्रीय स्मारक का बरे होऊ नये ? श्रीराममंदिर उभारल्यापासून भारतात हिंदुत्वाचे नाणे खणखणू लागले असले, तरीही साम्यवादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यांचा पगडा देशात टिकून आहे. त्यामुळेच तर रामसेतूसारख्या दैवी स्थापत्यरचनेला अध्यात्माच्या ऐवजी विज्ञानाच्या चष्म्यातून तोलून मापून पाहिले जाते. ‘ही विज्ञाननिष्ठता रामसेतूच्या संदर्भात दाखवली जाऊ नये, उलट धर्मनिष्ठा जोपासली जावी’, असे रामभक्तांना वाटते.

रामसेतू ते रामराज्य ! 

अयोध्येतील मंदिररूपाने उत्तरेकडून श्रीराम भारताचे रक्षण करत आहे, तर रामसेतूद्वारे तो दक्षिण बाजूनेही भारताला संरक्षित करत आहे, हे रामसेतूचे अद्वितीय माहात्म्य आहे. ‘केवळ रामरायाच्या कृपेने भारत सर्वथा सुरक्षित आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भगवान श्रीरामाचा वास भारतात असणे, ही देशासाठी खर्‍या अर्थाने आध्यात्मिक बलसंपन्नता आहे. याच्याच जोरावर रामसेतूसारख्या प्राचीन वास्तूरचनेचे अगाध ज्ञान भारताने संपूर्ण जगासमोर आणावे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून रामसेतू विश्वात अजरामर करायला हवा. सरकारने न्यायालयाच्या प्रश्नाला बगल न देता रामसेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करण्याची कारवाई लवकरात लवकर करायला हवी. हिंदूंनीही यासाठी सरकारचा पाठपुरावा घ्यावा. रामसेतूला न्याय मिळाल्यास भारतात रामराज्याची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही, हे निश्चित !

रामसेतूसारख्या दैवी स्थापत्यरचनेला विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिले जाणे, ही विज्ञाननिष्ठता झुगारून धर्मनिष्ठा जोपासा !