Goa State PCB : (म्हणे) ‘जलप्रदूषण टाळण्यासाठी घरी श्री गणेशमूर्ती पुजणार्‍यांनी पाण्याने भरलेल्या बालदीत श्रींचे विसर्जन करावे !’

प्रदूषण टाळण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची हास्यास्पद नियमावली

पणजी, २६ ऑगस्ट (वार्ता.) – जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशभक्तांसाठी एक हास्पापद नियमावली प्रसिद्ध केली आहे. यामध्ये घरी श्री गणेशमूर्ती पूजणार्‍यांनी पाण्याने भरलेल्या बालदीत श्रींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच केवळ कृत्रिम तलावांमध्ये श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीमध्ये पुढील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

१. घरी श्री गणेशमूर्ती पुजणार्‍या गणेशभक्तांनी शक्यतो पाण्याने भरलेल्या बालदीत श्रींचे विसर्जन करावे. हे पर्यावरणपूरक आहे. बालदीत मूर्ती पूर्ण विरघळेपर्यंत ठेवावी. बालदीत खाली माती साचल्यानंतर आवश्यकता भासल्यास तुरटीची पूड टाकून पाणी ढवळून घ्यावे. त्यानंतर बालदीतील वरचे पाणी उद्यानात वापरता येईल किंवा गटारात सोडता येईल. बालदीच्या खाली साचलेली माती सुकवून घ्यावी. ही माती पुढील वर्षी मूर्ती बनवण्यासाठी किंवा उद्यानात माती म्हणून वापरता येईल.

२. भक्तांना मूर्तीविर्सजन करायचे असल्यास त्यांनी ती स्थानिक स्वायत्त संस्था उभारणार असलेल्या केवळ कृत्रिम जलतलावांमध्ये विसर्जित करावी.

३. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचायत अथवा नगरपालिका या स्वायत्त संस्था यांना मूर्तीविसर्जनासाठी वसाहतींमध्ये (कॉलनीमध्ये) कृत्रिम तलाव बनवण्यास सांगितले आहे. स्वायत्त संस्थांना फिरते कृत्रिम तलाव निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे. यामुळे हे फिरते कृत्रिम तलाव कोणत्याही ठिकाणी सहजतेने नेता येतील. यामुळे पाण्याचे प्रदूषण, विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी आणि मूर्ती विसर्जनाच्या वेळी होणारे संभाव्य वाहन अपघात टाळता येतील. या कृत्रिम तलावामध्ये चुना आणि तुरटी ही रसायने मिसळण्यास सांगितले आहे.

४. समुद्रात केवळ पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील नसलेल्या ठिकाणीच आणि संबंधित संस्थांशी चर्चा करून श्रींचे विसर्जन करता येणार आहे.

५. कृत्रिम तलाव उभारणार असलेल्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाच्या पूर्वी निर्माल्य गोळा करण्यासाठी पुरेशा प्रमाणात डबे ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मूर्ती विसर्जन करण्यापूर्वी मूर्तीवरील फुले, पाने आणि कृत्रिम दागिने काढून घ्यावे आणि नंतरच ती विसर्जित करावी.


हे ही वाचा → SANATAN PRABHAT EXCLUSIVE : मशिदींवरील भोंग्यांकडे दुर्लक्ष; मात्र गणेशोत्सव-दिवाळी उत्सवांना लक्ष्य !

संपादकीय भूमिका :

  • चिकणमातीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होते याचा कोणता पुरावा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहे ?
  • प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती बंद करण्याकडे लक्ष द्यावे !