देवरहाटीच्या भूमीवरील महाराष्ट्र शासनाचे नाव काढून भूमी देवस्थानाच्या नावे करा !

मंडणगड (रत्नागिरी) येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाची शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

मंडणगड तहसीलदार श्री. अक्षय ढाकणे यांना निवेदन देतांना मंदिर विश्‍वस्त !

मंडणगड (जिल्हा रत्नागिरी), २४ ऑगस्ट (वार्ता) – महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील प्रावधानांचा (तरतुदींचा) भंग करून वर्ष २०१८ नंतर देवरहाटीच्या भूमीवरील देवस्थानाचा ताबा बेकायदेशीरपणे न्यून करून त्या जागी महाराष्ट्र शासन असे नाव नोंद केले गेले आहे. एकीकडे वक्फ बोर्ड हिंदूंच्या भूमींवर हक्क सांगत असून पिढ्यान्पिढ्या पूर्वजांनी देवस्थानाला दिलेल्या भूमी शासनच बेकायदेशीरपणे कह्यात घेते, याबद्दल जिल्ह्यातील देवस्थाने, ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्ट यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे देवस्थानाच्या देवरहाटी भूमीवरील महाराष्ट्र शासनाचे नाव न्यून करून भूमी तात्काळ देवस्थानाच्या नावे कराव्यात. या मागणीचे निवेदन १८ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंडणगड तालुक्यातील मंदिर विश्‍वस्तांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावे मंडणगडचे तहसीलदार श्री. अक्षय ढाकणे यांना दिले.

या वेळी पाट गावचे श्री. अशोक नटे, पाचरल येथील श्री. गजानन जंगम, मंदिर महासंघाचे दापोली संयोजक श्री. सुरेश रेवाळे, मंदिर महासंघाचे संयोजक श्री. रमेश कडू, जिल्हा संघटक श्री. सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश, श्री. शंकर जंगम आदी उपस्थित होते. या निवेदनावर लाटवण येथील श्री. चंद्रकांत जाधव, केळवत येथील श्री. रामचंद्र भोसले, श्री. उदय भोसले आदि मंदिर प्रतिनिधींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, निवेदनातील मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, आम्ही न्यायालयीन मार्गाचा अवलंब करू, तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल.