
राजाचा आत्मा हा एका नोकराच्या आत्म्याप्रमाणे सौम्य नि न्यायप्रिय असला पाहिजे. त्याच्यात अन्यांच्या (जनतेच्या) समस्यांप्रती उत्कट जाणीव असली पाहिजे. २ सहस्र वर्षांपूर्वी प्रसिद्ध रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस याने केलेले हे वक्तव्य ! जनतेप्रती अशी संवेदनशीलता सांप्रतकाळच्या राज्यप्रणालीत जवळपास दुरापास्त झाल्याचे दिसते. असे असले, तरी सद्य:स्थितीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे त्यास अपवाद ! इस्रायलच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सीमावर्ती क्षेत्रांपैकी एक असलेले उत्तर इस्रायलमधील क्षेत्र गोलान हाईट्स ! येथे शिया ड्रुझ मोठ्या प्रमाणात रहात असून सीरियाच्या सीमेशी हा भाग लागून असल्याने सीरियातील ड्रुझ समुदायाशी यांचे घनिष्ट संबंध. सीरियातील स्वेदा शहरात गेल्या काही कालावधीपासून सुन्नी मुसलमान असलेला बेदुइन समाज तेथील अल्पसंख्य शिया ड्रुझ समुदायावर आक्रमण करत आहे. सीरियाचे सरकार आणि सैन्य दोघेही बेदुइन समाजाच्या पाठीशी उभे राहून ड्रुझ समुदायावर आक्रमण करत असल्याने गेल्या काही दिवसांत ३०० ड्रुझ मारले गेले. इस्रायली ड्रुझ नागरिकांच्या भावना सीरियाई ड्रुझशी जोडलेल्या असल्याने नेतान्याहू यांच्या सैन्याने चक्क स्वेदा शहरावर आक्रमण केले. यामुळे सीरियाचे कंबरडे मोडले आणि अवघ्या ४ दिवसांत त्यांनी इस्रायलसमवेत युद्धबंदीची घोषणा केली. तरीही इस्रायल-सीरिया सीमा क्षेत्रात शांतता प्रस्थापित होण्यासाठी इस्रायली वायूदलाचा स्वेदा क्षेत्रावर बाँबवर्षाव चालूच आहे.
इस्रायलचे राजकर्तव्य !
इस्रायलने एकाच वेळी अनेक मोर्चे उघडले आहेत. दक्षिण-पश्चिमेला असलेल्या गाझापट्टीवरील आक्रमणे गेली अडीच वर्षे चालू आहेत. लेबनॉन, इराक, इराण, येमेन, वेस्ट बँक अशा विविध स्तरांवरही इस्रायलचा युद्धसंघर्ष चालू असतांना स्वत:च्या लोकसंख्येतील अवघ्या २ टक्के ड्रुझ समुदायाच्या भावनेसाठी इस्रायलने सीरियावर आक्रमण चढवले. शिया ड्रुझ समुदाय स्वत:स मुसलमान मानीत नाही. ते विविध धर्मांच्या विचारांच्या एकत्रीकरणाचा विचार ठेवतात. त्यामुळे हिंदु धर्मातील पुनर्जन्मावरही त्यांचा विश्वास आहे. इस्रायली सैन्यात ड्रुझ समुदाय मोठ्या प्रमाणात भाग घेतो, तसेच तो इस्रायली राष्ट्रवादाशी प्रामाणिक असल्याने इस्रायलने सीरियातील ड्रुझ समुदायाचे संरक्षण हे त्याचे राजकर्तव्य मानले आहे. त्यामुळेच बेंजामिन नेतान्याहू हे त्यांच्या नागरिकांच्या हितासाठी कार्य करणारा एक विरळा नेता असल्याचे आम्ही मानतो.
बांगलादेशी हिंदुसंहार !

काही जण सीरियातील ड्रुझ समुदायाप्रती असलेल्या इस्रायलच्या भूमिकेची तुलना बांगलादेशातील हिंदु समाज आणि त्यावर भारताची भूमिका हिच्याशी करत आहेत. या तुलनेत तथ्य आहे कि नाही, याची समीक्षा होणे हिंदु हितरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. ७८ वर्षांपूर्वी उदयाला आलेला पूर्व पाकिस्तान आणि वर्ष १९७१ मध्ये त्याचे बांगलादेशात झालेले रूपांतर. दोन्ही व्यवस्था हिंदुविरोधी. गेल्या ८५ वर्षांत तेथील हिंदूंची लोकसंख्या २८ टक्क्यांवरून ८ टक्क्यांच्याही खाली (७.९५ टक्के) गेली. मुसलमानांची संख्या मात्र ७० टक्क्यांवरून ९१ टक्क्यांवर पोचली. प्रत्यक्ष लोकसंख्या पाहिली, तर मुसलमान २ कोटी ७५ लाखांवरून १५ कोटींच्या वर गेले. टक्केवारीतील ही लोकसंख्यावाढ ५७५ टक्के. या जोडीला सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंह यांच्या २५ वर्षांपूर्वीच्या दाव्याला विसरून कसे चालेल ? ते म्हणाले होते की, भारतात तब्बल ५ कोटी बांगलादेशी घुसखोर मुसलमान निवास करत आहेत. यातून बांगलादेशातील धर्मांध मुसलमान भस्मासुराचा अनुमान येतो. दुसरीकडे पूर्व बंगालमधील हिंदूंचा आकडा १ कोटी ९५ लाखांपासून घटत आज १ कोटी ३१ लाखांवर येऊन ठेपला. थोडक्यात तेथील हिंदूंचा प्रत्यक्ष आकडाही ३३ टक्क्यांनी घटला. कारण स्पष्ट आहे – बांगलादेशी हिंदुसंहार. ‘सेंटर फॉर रिसर्च इन इंडो-बांगलादेश रिलेशन्स’ या भारत सरकारच्या कोलकात्यातील संस्थेचे अध्यक्ष बिमल प्रामाणिक यांनी लिहिलेल्या हिंदु नरसंहाराच्या अशा १३६ घटनांचा उल्लेख केला आहे, ज्या केवळ वर्ष १९७१ मध्ये घडल्या. ही सर्व आकडेवारी स्वत:च हिंदु नरसंहाराची किंचाळून ग्वाही देत आहेत.
हिंदुहितासाठी मोहीम राबवणे आवश्यक !
बांगलादेशात हिंदूंच्या रक्ताचे पाट सातत्याने प्रत्येक वर्षी, प्रत्येक ऋतूत, प्रत्येक सणाला वहात आले आहेत, आजही अव्याहत वहात आहेत. सीरियाशी लढा उभारून ‘अल्पसंख्य’ ड्रुझ नागरिकांप्रती इस्रायल उत्कट कर्तव्यभावना जोपासतो; परंतु ‘बहुसंख्य’ हिंदु नागरिकांप्रतीची भावना लुप्त झाल्याने भारत तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी काहीही करत नाही. सर्वपक्षीय शासनकर्त्यांच्या जोडीला भारतीय हिंदूंमध्येही धर्मबंधुत्वाचा कमालीचा अभाव आहे. ऑगस्ट २०२४ मधील उदाहरण. तेथील हिंदूंवर २ सहस्रांहून अधिक आक्रमणांच्या घटना घडल्या, याचे दाखले ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ संघटनेने देऊनसुद्धा भारताने बांगलादेश क्रिकेट संघाला पायघड्या घातल्या आणि सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये भारत-बांगलादेश संघांत कसोटी सामने झाले. तेथील हिंदु महिलांवर प्रतिदिन बलात्कार होत आहेत. त्यांच्यावरील अत्याचारांचे व्हिडिओही सर्वत्र प्रसारित होत आहेत. मूठभर हिंदुत्वनिष्ठ संघटना सोडल्या, तर कोट्यवधी भारतीय हिंदू यावर चकार शब्दही काढत नाहीत. केंद्र सरकारकडूनही याविषयी अनेक वेळा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या; परंतु अजूनही बांगलादेशातील हिंदूंच्या संदर्भात ठोस उपाय काढण्यात आलेला नाही. उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ शासन वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशातून स्वत:चा जीव वाचवत पीलीभीतमध्ये स्थायिक झालेल्या २ सहस्र हिंदु कुटुंबांना भूमी प्रदान करणार आहे, या गोष्टीचे स्वागत झाले पाहिजे. ६ वर्षांपूर्वी झालेला नागरिकत्व सुधारणा कायदाही स्वागतार्ह होता; परंतु हे पुरेसे पाऊल आहे का ?, हा खरा प्रश्न आहे.
१४० कोटींची लोकसंख्या हाताळणे हे अंतर्गत आव्हान, तर चीन आणि पाकिस्तान यांची आव्हाने, चीनचे अतीमहत्त्वाकांक्षी भूराजकारण, बांगलादेशाशी असलेला व्यापार ही बाह्य जटिल आव्हाने भारतासमोर आहेत, हे मान्य. तरीही कुशाग्र परराष्ट्रनीतीचा अवलंब करून बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी ठोस प्रयत्न झाले पाहिजेत. भारताला रशियाची ‘रसकी मीर’ (रशियन वर्ल्ड) नावाची राष्ट्रवादी मोहीम राबवण्याचा विचार करता येईल. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर बाहेर पडलेल्या देशांमध्ये रशियन राष्ट्राची भावना जोपासण्यासाठी नव्वदच्या दशकात व्लादिमिर पुतिन यांनी ही मोहीम चालू केली. धर्मबंधुत्वास प्राधान्य देऊन आपणही ‘रिक्लेमिंग हिंदु लाईफ’सम (हिंदु जीवन परत मिळवणे) मोहीम हाती घेऊ शकतो. हिंदुहितरक्षण हे या मोहिमेचे उद्दीष्ट ठेवून बांगलादेशावर ‘स्वतंत्र हिंदुदेश’ निर्मितीचा दबाव आणता येईल. हिंदुसंहारावर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो, हे निश्चित !
| बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारताने व्यापक मोहीम आखून स्वतंत्र हिंदुदेशाच्या निर्मितीसाठी बांगलादेशावर दबाव आणणे आवश्यक ! |

संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
संपादकीय : अमेरिकी तरुणांची रचनात्मकता !
संपादकीय : सरकारी शाळा बंद का पडतात ?
संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?
संपादकीय : मेकॉले यशस्वी झाला !
संपादकीय : सतलूज !