मुंबई विद्यापिठाच्या ‘मादाम कामा मुलींच्या वसतीगृहा’ची चौकशी करू !

उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई, १८ जुलै (वार्ता.) – मुंबई विद्यापिठाच्या ‘मादाम कामा मुलींच्या वसतीगृहा’ची भोजन आणि संरक्षण व्यवस्था व्यवस्थित असायला हवी. सुविधा मिळत नसणार्‍यांची सूची सिद्ध करू. मुंबई विद्यापिठाच्या कलिना वसतीगृहातही समस्या आहेत. दोन्ही वसतीगृहांची प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी ६ आमदारांची समिती स्थापन करून प्रत्यक्ष भेटून पडताळणी करू, असे आश्वासन उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले.

उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

‘मादाम कामा महिला वसतीगृहा’त मूलभूत सुविधांचा अभाव असल्याविषयीचा तारांकित प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केला होता. या चर्चेत शिवसेनेच्या मनीषा कायंदे, भाजपचे प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

या वसतीगृहामध्ये १२६ विद्यार्थिनी रहातात. अनेकदा तेथील भोजनगृह बंद असते. त्यामुळे विद्यार्थिनींच्या जेवणाची गैरसोय होते. वसतीगृहाला ‘वॉर्डन’ (पर्यवेक्षक) नसल्याने मुलींच्या सुरक्षिततेकडेही दुर्लक्ष होते. पाण्याच्या सुविधेचा अभाव, पाणी उष्ण करणारी यंत्रे अल्प प्रमाणात असणे, अशा तक्रारी विद्यार्थिनींनी केल्या आहेत.