श्री नर-नारायण यांच्याप्रमाणे इंद्रियांवर नियंत्रण असणारे आणि साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणारे परामात्मास्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. भगवंताने घातलेल्या नियमांचे पालन करून श्री नर-नारायण यांनी ‘सहस्र कवचन’ नावाच्या असुराचा वध करणे

‘नारायणीम्’ हा मध्ययुगीन संस्कृत ग्रंथ आहे. त्यात भागवत पुराणाचे सार आहे. १६ व्या दशकात श्री नर-नारायण अवताराचे वर्णन आहे. श्रीमन्नारायणाने नर आणि नारायण या दोन ऋषींच्या रूपात एकाच वेळी अवतार घेतला. ही दोन्ही रूपे तपश्चर्या आणि धर्माचे पालन करणारी मानली जातात. नर आणि नारायण यांनी बद्रिकाश्रमात १ सहस्र वर्षे तपश्चर्या अन् युद्ध एकाच वेळी केले. ‘सहस्र कवचन’ नावाचा एक असुर होता. त्याच्याकडे स्वतःच्या संरक्षणासाठी १ सहस्र शरीरकवचे होती. त्याला असे वरदान होते की, जो कुणी १ सहस्र वर्षे सतत तपश्चर्या आणि युद्ध करील, तोच त्याला पराभूत करू शकेल. श्री नर-नारायण यांनी आळीपाळीने तपश्चर्या आणि युद्ध केले अन् त्या असुराचा पराभव करून देवांचे रक्षण केले. श्री नर-नारायण केवळ आपल्या संकल्पाने असुराला मारू शकले असते; परंतु भगवंताने (श्री नर-नारायण यांनी) स्वतः घातलेल्या नियमांचे उल्लंघन केले नाही.

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

२. नर-नारायण यांची तपश्चर्या पाहून इंद्राला त्याचे पद जाण्याची भीती वाटणे आणि त्याने त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करणे

‘श्री नर-नारायण १ सहस्र वर्षांपेक्षा अधिक काळ तपश्चर्या करत आहेत’, हे पाहून इंद्राला दोन कारणांमुळे मत्सर वाटू लागला. पहिले कारण, म्हणजे श्री नर-नारायण यांचे स्वतःच्या इंद्रियांवर असलेले नियंत्रण, जे इंद्रामध्ये नव्हते आणि दुसरे म्हणजे इंद्राला ‘आपले पद काढून घेतले जाईल’, याची भीती वाटत होती. त्यामुळे श्री नर-नारायण यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्राने कामदेव, वसंतऋतू, वारा आणि अप्सरा यांना पाठवले.

३. नर-नारायण यांची तपश्चर्या भंग करण्यात कामदेव इत्यादी असमर्थ ठरणे

श्री नर-नारायण यांच्या तपश्चर्येत किंचितही व्यत्यय आणण्यात ते यशस्वी ठरले नाहीत. श्री नर-नारायण तपश्चर्येत इतके तल्लीन होते की, कामदेव आणि त्याच्या समवेत आलेल्या सर्वांचे प्रयत्न व्यर्थ गेले.

४. ‘तपश्चर्येत विघ्न आणल्याबद्दल नर-नारायण शाप देतील’, अशी भीती कामदेव इत्यादींना वाटणे; पण नर-नारायण यांनी त्यांच्यावर न रागावता उलट त्यांना भेट म्हणून स्त्री-रत्न देणे

‘तपश्चर्येत विघ्न आणल्याबद्दल श्री नर-नारायण आपल्याला शाप देतील’, अशी भीती त्यांना वाटू लागली. आश्चर्य म्हणजे असे काहीच घडले नाही. ‘या सर्वांच्या मनात काय चालले आहे ?’, हे श्री नर-नारायण चांगले जाणून होते. श्री नर-नारायण यांनी प्रत्येकाला त्यांच्या नावाने प्रेमाने हाक मारली आणि प्रेमळपणे हसून ते म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या मनात एक स्त्री-रत्न निर्माण केले आहे. देवलोकातही अशी स्त्री मिळणे दुर्मिळ आहे. आम्ही तिला तुम्हाला देवलोकात घेऊन जाण्यासाठी भेट म्हणून देऊ.’’

कामदेव आणि त्याच्या समवेत असलेले इतर यांना पुष्कळ आश्चर्य वाटले. तपश्चर्येत विघ्न आणण्याचा प्रयत्न करूनही श्री नर-नारायण क्रोधित तर झाले नाहीतच; मात्र उदार अंतःकरणाने त्यांनी कामदेव इत्यादींना भेट दिली आणि त्यांनी दृष्कृत्य करूनही त्यांना आशीर्वाद दिला.

५. केवळ परमात्म्याचेच क्रोधावर पूर्ण नियंत्रण असणे आणि ‘त्रास देणार्‍यांवरही दया करणे’, हा त्याचा अद्वितीय गुण असणे

षडरिपूंपैकी काम (वासना) आणि क्रोध (राग) यांवर नियंत्रण मिळवणे अधिक कठीण असते. त्यांतही क्रोधावर नियंत्रण मिळवणे अत्यंत कठीण आहे. अनेक ऋषिमुनींनी आपल्या वासनेवर विजय मिळवला असला, तरी तेही क्रोधाला वश झाले. जेव्हा कुणी त्यांच्या तपश्चर्येत विघ्न आणले, तेव्हा त्यांनी रागाच्या भरात शाप दिला आहे. केवळ परमात्म्याचेच क्रोधावर पूर्ण नियंत्रण असते आणि एवढेच नाही, तर केवळ तोच इतका दयाळू आहे की, त्याच्या तपश्चर्येत विघ्न आणणार्‍यांनाही तो आशीर्वाद अन् भेट देतो. परमात्म्याचे हे अद्वितीय आणि उदात्त गुण आहेत.

६. परमात्म्याचे वरील अद्वितीय गुण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात असल्याची जाणीव होणे

परमात्म्याचे हे अद्वितीय गुण वाचून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला ‘हेच अद्वितीय गुण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात आहेत’, याची जाणीव झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व सांगून त्यासाठी ती प्रक्रिया राबवण्यास सांगितली आहे; मात्र आम्हा साधकांकडून त्यांचे आज्ञापालन होत नाही, तरीही साधकांवर न रागावता आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी ते साधकांना प्रत्येक टप्प्याला प्रेमाने मार्गदर्शन करत असतात, तसेच साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया कृतीत आणेपर्यंत सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव शांतपणे वाट पहातात.

‘हे भगवंता (परात्पर गुरुदेव), तू साक्षात् परमात्मा असल्याचा तुला यापेक्षा आणखी दुसरा काय पुरावा हवा आहे ? तूच एकमेव आहेस, जो केवळ रागावर नियंत्रण ठेवतो, असे नाही, तर साधकांवर प्रेमाचा वर्षावही करतोस. हे परमेश्वरा, तुझ्या चरणकमलांची धूळ बनण्यासाठी तूच आम्हा साधकांना पात्र बनव’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन् (सनातनच्या ७० व्या संत, वय ५९ वर्षे), चेन्नई, तमिळनाडू. (६.१.२०२४)