प्रत्येक क्षणी साधकांना शिकवणारे आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष कृती करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. रूपाली कुलकर्णी

१. एका हिंदी भाषिक साधिकेने मराठी ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून साधनेसाठी प्रेरणा मिळते’, असे सांगणे

‘१८.५.२०२५ या दिवशी मी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील प्रदर्शन पहात होते. त्या वेळी एक साधिका माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी ओळखीच्या असल्याप्रमाणे मला हसतमुखाने हात जोडून नमस्कार केला. मीही त्यांना हात जोडून नमस्कार करत म्हणाले, ‘‘मला क्षमा करा. मी आपल्याला ओळखले नाही.’’ त्यावर त्या हिंदी भाषेत मला म्हणाल्या, ‘‘मला मराठी बोलता येत नसले, तरी वाचता येते. मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचते. त्यातील लेख वाचून मला साधनेसाठी प्रेरणा मिळते.’’

२. प.पू. गुरुदेवांनी एका साधिकेला ‘या जन्मात आध्यात्मिक प्रगतीचा विचार करू नका’, असे सांगूनही ‘ती साधना करत आहे’, हे वाचून वाचिकेला (साधिकेला) प्रेरणा मिळणे

त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या एका लेखाचा संदर्भ देऊन मला सांगितले, ‘‘एकदा प.पू. गुरुदेवांनी तुम्हाला ‘तुमचे प्रारब्ध तीव्र आहे. तुम्ही या जन्मात आध्यात्मिक प्रगतीचा विचार करू नका’, असे सांगितले होते, तरी तुम्ही साधना करायचे सोडले नाही. तुम्ही साधना करत राहिलात. त्यामुळे तुमच्याकडून मला साधना करण्याची प्रेरणा मिळाली. तुमच्या अन्य लेखांतूनही मला साधना करण्याची प्रेरणा मिळते.’’

पू. संदीप आळशी

३. पू. संदीप आळशी यांनी आध्यात्मिक प्रगतीविषयीचे लिखाण लिहून देण्यास सांगितल्यावर तिने दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लेख लिहिणे

त्यांचे हे बोलणे ऐकून मला प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली; कारण त्यांनी ज्या लेखाचा संदर्भ दिला होता, तो लेख लिहायचे मी अनेक दिवस टाळले होते. पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे (समष्टी) संत, वय ५० वर्षे) यांनी मला दोन वेळा माझ्या आध्यात्मिक प्रगतीविषयीचे लिखाण लिहून देण्यास सांगितले होते. त्यानंतर मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वरील लेख लिहिला होता.

४. प.पू. गुरुदेवांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व लक्षात येणे

वरील प्रसंगातून प.पू. गुरुदेवांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. प.पू. गुरुदेव पुष्कळ वेळा सर्वांना ‘अनुभूती आणि अनुभव लिहून देणे, ही समष्टी साधना आहे’, असे सांगतात. प.पू. गुरुदेवांनी मला त्याची प्रचीती दिली. पूर्वी काही वेळा माझ्या मनात ‘लिखाण लिहून देऊ नये. यातून इतरांना काय शिकायला मिळणार ? उगीचच आपण आपल्या अनुभूती लिहून स्वतःचा अहं वाढवतो’, अशा प्रकारचे विचार यायचे.

या प्रसंगामुळे ‘अनुभव किंवा अनुभूती लिहून देणे’, हे प.पू. गुरुदेवांचे आज्ञापालन आहे आणि ‘गुरूंचे आज्ञापालन करणे’, हा शिष्याचा सर्वाेत्तम गुण आहे’, म्हणून लिखाण करायचे’, हे माझ्या मनावर ठसवण्यासाठीच हा प्रसंग प.पू. गुरुदेवांनी घडवला आहे’, याची मला जाणीव झाली. प्रत्येक क्षणी आम्हाला शिकवून आमच्याकडून प्रत्यक्ष कृती करून घेणार्‍या गुरुमाऊलीच्या चरणी मी कृतज्ञ आहे.’

– कु. रूपाली कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४१ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (२.६.२०२५)