लोकसंख्येचे केंद्रीकरण, निसर्गाचा र्‍हास आणि धर्माचरणाची आवश्यकता !

दिवा-मुंब्रा रेल्वेलाईनवर ९ जून या दिवशी झालेल्या अपघातात४ प्रवाशांनी जीव गमावला. ८-९ प्रवासी गंभीर घायाळ झाले. ‘२ रेल्वे एकाचवेळी एकमेकांना ओलांडतांना एका वळणावर दरवाज्याबाहेर लटकून उभे असलेले प्रवासी एकमेकांवर आपटून खाली फेकले गेले’, असे प्राथमिक कारण समोर आले.

१. मुंबई : मृत्यूच्या सावलीतील शहर

या घटनेनंतर ‘मुंबईत रेल्वेस्थानके वाढली पाहिजेत, रेल्वेगाड्यांच्या फेर्‍या वाढल्या पाहिजेत, रेल्वेगाडीच्या डब्यांची संख्या वाढली पाहिजे, थांबे वाढले पाहिजेत, रेल्वेच्या डब्यांचे दरवाजे स्वयंचलित असावेत’, अशा मागण्या तक्रारीच्या स्वरूपात मुंबईकर आणि स्थानिक नेते करतांना दिसत आहेत; पण यामागील प्रमुख कारणांविषयी कुणीच बोलत नाही, ते म्हणजे वाढती लोकसंख्या आणि लोकसंख्येचे मुंबईसारख्या शहरात होणारे केंद्रीकरण !

‘देशाची आर्थिक राजधानी’ ही बिरूदावली मिरवणार्‍या मुंबई शहराची स्थिती वाढत्या लोकसंख्येमुळे अतिशय दयनीय झाली आहे. मानवी रहाणीमानासाठी आवश्यक प्राथमिक मापदंड यातून ते (मुंबई शहर) केव्हाच नाहीसे झाले आहे. जन्माला येणारी लोकसंख्या आणि देशभरातून प्रतिदिन मुंबईमध्ये स्थलांतरित होणारी लोकसंख्या यांवर कुणाचेच कसलेही बंधन नसल्यामुळे हे शहर आता जणू त्याचे शेवटचे श्वास मोजत आहे. सुमारे २ कोटी ५० लाख लोकसंख्येचा भार उचलतांना येथील रहिवास, सांडपाणी, पिण्याचे पाणी, विजेची सोय, प्राथमिक आरोग्य या सुविधा, तसेच प्रवास, रहदारी, प्रदूषणाची वाढलेली भयावह पातळी, आडवे पसरायला मर्यादा असल्याने उभे पसरण्यासाठी गगनचुंबी इमारती, या इमारतींसाठी पाण्यात मातीचा भराव टाकणे आणि अमर्याद वृक्षतोड, वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेली गुन्हेगारी, अपघात, पोलीस आणि प्रशासन यांच्या अन्य अंगांची अपुरी संख्या, त्यामुळे या घटकांवर येणारा ताण, त्यातून फोफावणारा भ्रष्टाचार या आणि अशा अनेक समस्यांनी मुंबई शहर दबले गेले आहे. यावर कुठलेही उपाय करणे म्हणजे गळक्या बोटीतील पाणी जाण्यासाठी नवीन छिद्र पाडण्यासारखे आहे. सर्व उपाय हे वरवरचे असून कायमस्वरूपी समस्या निराकरण करणारे नाहीत.

श्री. अनिकेत विलास शेटे

१ अ. मुंबईकडे लोकसंख्येचा लोंढा ओढला जाण्याची कारणे : देशातील सर्व प्रमुख आस्थापनांची कार्यालये मुंबईत आहेत. आंतराष्ट्रीय विमान सेवा, पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर, देशांतर्गत रेल्वेसेवा आणि रस्ते वाहतूक यांमुळे मुंबईला जगात अन् प्रामुख्याने देशात महत्त्व प्राप्त झाले आहे. आज जी लोकसंख्या मुंबईमध्ये रहाते, तिच्या सुरक्षिततेसाठी मुंबईवर देशाचे असलेले अवलंबित्व न्यून करणे आवश्यक आहे. यात प्रांतीय राजकारण न आणता मुंबईकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणून राज्यातील अन्य जिल्ह्यांत प्रयत्न करून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. तरच मुंबईकडे येणारा लोकसंख्येचा लोंढा न्यून होईल आणि हाताबाहेर गेलेल्या समस्या निवारण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची संधी मिळेल.

१ आ. प्रत्येक जिल्ह्यात रोजगाराच्या समान संधी उपलब्ध झाल्यास शहरांतील लोकसंख्येची आवक थांबेल ! : यावर ठोस उपाय म्हणजे मुंबईमधील लोकसंख्या ठरवून नियंत्रित करणे आणि मुंबईचे देशातील संपूर्ण समाजाला असलेले आकर्षण न्यून करणे. गेल्या अनेक दशकांपासून प्रत्येकाला आशा आहे की, मुंबईत जाऊन स्वप्ने पूर्ण होतील. उपजीविकेचा प्रश्न सुटेल. चांगले पैसे कमवायचे, तर मुंबईविना पर्याय नाही; कारण रोजगाराच्या संधी तेथे आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या वर्षांत रोजगार, उद्योग यांच्या समान संधी निर्माण होऊ न शकणे हे सर्वपक्षीय नेत्यांचे अपयश आहे. प्रत्येक जिल्ह्यात उद्योग आणि रोजगार यांच्या समान संधी उपलब्ध झाल्यास मुंबईसारख्या शहरांतील लोकसंख्येची आवक थांबेल.

२. शेतीपेक्षा शहरातील रोजगार सोपा का वाटतो ?

लोकसंख्या स्थानांतरणाचे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे शेती करणे परवडेनासे झाले आहे. हरित क्रांतीच्या यशापासून खते आणि कीटकनाशके यांचा अतीवापर अन् सतत त्याच नगदी पिकांचा आग्रह यांमुळे भूमीचा कस न्यून झाला आहे. वृक्षतोडीमुळे पृथ्वीवरील पर्जन्याचे प्रमाण घटले. वृक्षतोड आणि वाढत्या सिमेंटच्या जंगलांमुळे भूमीत पाणी मुरण्याचे प्रमाण न्यून होऊन भूजल पातळी न्यून झाली आहे. यामुळे शेती करणे अशक्य वाटते; म्हणून शेतीपेक्षा शहरातील रोजगार सोपा वाटून रोजगारासाठी शहराकडे येणार्‍यांची संख्या प्रतिदिन वाढत आहे.

२ अ. ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ला प्रोत्साहन आवश्यक : शेतीचे बिघडलेले गणित देशी गायींच्या साहाय्याने ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’च्या प्रयोगातून सुधारता येते, हे पद्मश्री श्री. सुभाष पाळेकर यांनी त्यांच्या प्रयोगातून सिद्ध केले आहे. सर्व शेतकर्‍यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास भूमीचा बिघडलेला कस दुरुस्त होऊन रासायनिक खतांच्या वापराविना सेंद्रीय उत्पादन घेता येईल. आज अनेक आजारांचे मूळ कारण असलेले रासायनिक पदार्थ अन्नसाखळीपासून दूर होतील. पाळेकरांच्या अभ्यासपूर्ण प्रयोगाला सरकारने राज्यभर प्रोत्साहन देणे, शेतकर्‍यांसाठी कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे.

३. निसर्ग जपण्यासाठी हिंदु तत्त्वज्ञानाचे स्मरण आणि आचरण हाच मार्ग !

आपले रहाणीमान सुसह्य व्हावे, वेळ वाचावा; म्हणून माणूस नवनवीन शोध लावून विविध उपकरणे वापरतो, मोठमोठी घरे बांधतो, पैसा कमावण्यासाठी उद्योगधंदे करतो. याला आपण ‘विकास’ म्हणतो; पण हा ‘विकास’ साधण्यासाठी कुठलाही सारासार विचार न करता उपलब्ध नैसर्गिक स्रोतांना अक्षरश: ओरबाडत आहोत. हे करतांना पुढे येणार्‍या आपल्या पिढ्यांसाठी पृथ्वीवर आपण काय शिल्लक ठेवतो ? याचे भानही आपल्याला उरलेले नाही. केवळ पैसा कमवण्यासाठी मनुष्याचे जगणे चालू आहे. आपल्या आवश्यकता न्यूनतम ठेवणे, निसर्गाप्रती कृतज्ञतेची भावना मनात जपणे, प्रकृतीनुसार साधना करत जगण्याचा आनंद घेत आपली येथील (पृथ्वीवरील) वेळ पूर्ण झाल्यावर आनंदाने आपली जागा पुढील पिढीसाठी मोकळी करून पुढच्या प्रवासाला निघणे, हे हिंदु संस्कृतीतील तत्त्वज्ञान आपण विसरून गेलो आहोत.

निसर्ग प्रत्यक्ष बोलू शकत नसला, तरी तो अप्रत्यक्षपणे अनेक प्रसंगांतून आपल्याला सावध करत आहे. त्याचे संकेत आपल्याला समजत नाहीत किंवा ते समजून घेण्याच्या मनस्थितीत आपण नाही. त्यामुळे त्याची फळे आपल्याला भोगावी लागत आहेत; असा एखादा प्रसंग घडला की, चूक कुणाची ? उत्तरदायी कोण ? हे ठरवण्यासाठी २-३ दिवस प्रसारमाध्यमांमध्ये आरोप-प्रत्यारोप, चर्चासत्रे यांना पेव फुटते. एखादी समिती किंवा आयोग नेमला जातो. एकदा का उत्तरदायित्व दुसर्‍यावर ढकलून झाले की, आपण त्यातून मोकळे होतो. एखादी घटना घडण्यासाठी व्यक्ती, संस्था किंवा प्रशासन उत्तरदायी असेलही; पण त्यांचे उत्तरदायित्व हे काही प्रमाणात असून आपण सर्वजण या सामायिक र्‍हासासाठी उत्तरदायी आहोत, हे सत्य आपण जोपर्यंत स्वीकारत नाही आणि वागण्यावर, भौतिक गोष्टींच्या हव्यासावर जोपर्यंत नियंत्रण आणत नाही, तोपर्यंत ही स्थिती पालटणार नाही. हे नियंत्रण केवळ धर्माचरणानेच येऊ शकते. हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे गृहस्थाश्रमाची सूत्रे सर्व समाजाने पाळली आणि त्या चौकटीत स्वतःचे आचरण ठेवले, तर हे चित्र नक्कीच पालटू शकते. आज मृत झालेल्या व्यक्तींविषयी आपण हळहळ व्यक्त करतो. वेळीच आपण सुधारलो नाही, तर उद्या आपल्या मृत्यूवर हळहळण्यासाठी कुणी शिल्लक नसेल !

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– श्री. अनिकेत शेटे, पिंपरी-चिंचवड, पुणे. (१०.६.२०२५)