संगमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थानात वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू

आपला पेहराव संस्कृतीला धरून असावा’, ही संकल्पना  

देवरुख – रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी भारतीय संस्कृतीला साजेसी वस्त्रसंहिता (वस्त्रसंहिता : मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)  (ड्रेस कोड) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय श्री मार्लेश्वर देवस्थान समितीने घेतला आहे. याजसमवेत पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने दर्शनाच्या वेळेतही पालट करण्यात आला आहे.

१. भाविकांचा पेहराव हा हिंदु परंपरेला साजेसा, सुसंस्कृत असावा. जेणेकरून श्री स्वयंभू महादेवाचे दर्शन घेतांना मंदिर परिसरातील वातावरणात आपल्याला लाभलेला सांस्कृतिक वारसा आणि मंदिर परिसराचे पावित्र्य टिकवणारा असेल.

२. भाविकांनी अंगभर वस्त्र परिधान करून श्री स्वयंभू मार्लेश्वराचे दर्शन घ्यावे.

३. पावसाळ्यात श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे मोठ्या संख्येने येणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून, दर्शनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

४. श्री मार्लेश्वर मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच भाविकांसाठी खुले राहील. सायंकाळनंतर संभाव्य धोके टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तरी सर्व भाविकांनी या नियमांचे पालन करून देवस्थान समितीला सहकार्य करावे, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

५. श्री देव मार्लेश्वराचे श्रावणी सोमवार अथवा वार्षिक धार्मिक विधी उत्सवांच्या वेळी त्या त्या वेळी योग्य निर्णय घेवून मंदिर भाविकांसाठी अधिक कार्यकाळ उघडे राहील.