वारीकाळात धर्मकार्यासाठी संयुक्त अभियान राबवणार !

आषाढी वारीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे वारकरी संप्रदायातील प्रमुख, संत-महंत यांच्या भेटी-संपर्क अभियान !

ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लहवीतकर महाराज यांच्याशी चर्चा करतांना श्री. सुनील घनवट (डावीकडे)

पुणे – आषाढी वारीच्या निमित्ताने देहू-आळंदी, पुणे, संभाजीनगर परिसरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वारकरी संप्रदायातील प्रमुख, संत-महंत यांच्या भेटी घेऊन त्यांच्यापर्यंत राष्ट्र-धर्म यांच्याशी संबंधित विषय पोचवण्यात येत आहेत. या भेटीच्या कालावधीत इंद्रायणी नदीच्या परिसरात होणारे पशूवधगृह, इंद्रायणी-चंद्रभागा नदीप्रदूषण, वारकरी संप्रदायावर होणारे आघात, तसेच अंधश्रद्धा निर्मूलनवाले-नास्तिकवादी यांची वारीत छुप्या मार्गाने होणारी घुसखोरी यांसह विविध विषयांवर व्यापक चर्चा होत आहे. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट, सर्वश्री पराग गोखले, महेश पाठक, विनीत पाटील, रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांसह अन्य उपस्थित होते.

१. प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लहवीतकर महाराज यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले. ‘हिंदु जनजागृती समिती वारकरी, तसेच हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांसाठी स्तुत्य प्रयत्न करत आहे. समितीच्या कार्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे’, असे त्यांनी सांगितले.

‘श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट, सरला’ येथील पीठाधीश महंत रामगिरी महाराज यांच्याशी चर्चा करतांना श्री. घनवट (डावीकडे)

२. ‘श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट, सरला’ येथील पीठाधीश महंत रामगिरी महाराज यांनी ‘समिती आणि वारकरी यांचे संयुक्त मेळावे घेऊ. यातून मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविक यांचे प्रबोधन होईल’, असे सांगितले.

‘देवगड संस्थान’चे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांचाशी चर्चा करतांना श्री. सुनील घनवट (उजवीकडे)

३. ‘देवगड संस्थान’चे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांचाशी चर्चा करतांना श्री. सुनील घनवट यांनी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे यांच्यासारख्या निरपराध हिंदुत्वनिष्ठाला गोवले जात आहे, त्यांना अन्याय्यरित्या वर्षानुवर्षे कारागृहात ठेवले जात आहे’, या संदर्भात माहिती दिली. ‘श्री. विक्रम भावे यांनी लिहिलेल्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकात त्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. श्री. विक्रम भावे यांच्यासारख्यांना केवळ हिंदुत्वाचे कार्य करतात म्हणून २ वर्षे कारागृहात ठेवण्यात आले, असे सांगितले. या संदर्भात आवाज उठवणे आवश्यक आहे’, असेही श्री. घनवट म्हणाले.

‘देवगड संस्थान’चे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज (श्री. सुनील घनवट यांच्या शेजारी) यांच्याशी चर्चा करतांना श्री. सुनील घनवट (डावीकडे)

४. ‘देवगड संस्थान’चे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांना श्री. सुनील घनवट यांनी वारीच्या मार्गावर मांसविक्रीची दुकाने, बिअर बार, मद्य विक्रीची दुकाने उभारणे, हे केवळ अनुचितच नाही, तर धार्मिक भावना दुखावणारे आहे. मागील वर्षीप्रमाणे, यावर्षीही महाराष्ट्र शासनाने वारीच्या मार्गावरील आणि तीर्थक्षेत्रांपासून (आळंदी, पंढरपूर, देहू, मुक्ताईनगर, पैठण) किमान ५ किलोमीटरचा परिसर कायमस्वरूपी ‘मद्य-मांसविक्रीमुक्त क्षेत्र’ म्हणून घोषित करावा आणि त्याची कठोर कार्यवाही करावी, यांसाठी प्रयत्न करायला हवेत’, असे आवाहन केले.