योग म्हणजे मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी केला जाणारा अभ्यास. योगाचा उद्देश मानसिक संतुलन निर्माण करणे, शारीरिक आरोग्य सुधारणे आणि आत्मसाक्षात्कार करणे हा आहे.
योगाचे प्रकार : ज्ञानयोग, हठयोग, कर्मयोग, भक्तीयोग, राजयोग, क्रियायोग, मंत्रयोग, लययोग इ.
महर्षि पतंजलि यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची ८ अंगे सांगितली आहेत. ती योगसाधनेच्या परिपूर्णतेसाठी आवश्यक आहेत.

प्राणायाम
‘प्राणायाम’ ही संज्ञा ‘प्राण’आणि ‘आयाम’ या २ शब्दांनी तयार झाली आहे. ‘प्राण’ म्हणजे आपली जीवनशक्ती, तर ‘आयाम’ याचा अर्थ विस्तारणे होय. प्राणायाम म्हणजे दीर्घश्वसन नाही किंवा श्वसनाचा व्यायामदेखील नाही. प्राणायामामुळे आपल्याला भरपूर प्राणवायू मिळत नाही, तर शरीर (अन्नमय कोश) आणि मन (मनोमय कोश) यांमध्ये चैतन्याचा प्रसार होतो. प्राणायामाचे उद्दिष्ट अधिक प्राणवायू मिळवणे नाही, तर मनाचे नियंत्रण हे आहे.
प्राणायाम ही श्वासाचे (श्वसन) योग्य नियंत्रण करून नाड्यांचे शुद्धीकरण करण्याची योगशास्त्रातील एक पद्धत आहे. ज्यामुळे शरीरातील जीवनशक्ती वृद्धींगत होते. प्राणायाम हा हठयोग आणि पातंजल (अष्टांग) योगाचा एक प्रमुख भाग आहे. आसनांच्या दीर्घ अभ्यासामुळे साधक प्राणायामासाठी सिद्ध होतो.

नाडीशुद्धी
योगशास्त्राप्रमाणे शरीरातील उजवी आणि डावी बाजू अनुक्रमे सूर्य अन् चंद्र तत्त्वांशी सबंधित असल्याचे मानले जाते. आपल्या शरीरात ७२ सहस्र नाड्या आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाच्या ३ नाड्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना. या नाड्यांमध्ये ‘मल’ (अशुद्धी) साठल्यास या नाड्यांमधून प्राणशक्ती वाहू शकत नाही. त्यामुळे रोग निर्माण होतात. हा अडथळा दूर करणे म्हणजेच नाडीशुद्धी होय.
प्राणायामाची उद्दिष्टे
- शरीर आणि मनाची स्थिरता : प्राणायामाचा एक उद्देश मन आणि चित्तवृत्ती यांवर नियंत्रण मिळवणे, हा आहे. ज्यामुळे ताण आणि चिंता न्यून होऊन मानसिक शांतता, संतुलन अन् स्थिरता प्रस्थापित होते.
- श्वासोच्छ्वासावर नियंत्रण : प्राणायाम श्वासाच्या माध्यमातून मनावर नियंत्रण ठेवण्यास साहाय्य करतो.
- प्राणऊर्जा (महत्त्वाची ऊर्जा) वाढवणे : प्राणायाम प्राणऊर्जा वाढवते, ज्यामुळे व्यक्ती अधिक उत्साही आणि तंदुरुस्त रहाते.
- एकाग्रता वाढवणे : प्राणायाम मनाची एकाग्रता वाढवण्यास साहाय्य करतो.
- आत्मजागरूकता वाढवणे : प्राणायामामुळे आत्मजागरूकता वाढीस लागते.
प्राणायामाची प्रक्रिया
- प्राणायाम करण्यासाठी पद्मासन, अर्धपद्मासन, सिद्धासन किंवा साधी मांडी घालून ताठ बसावे.
- श्वास घेणे-सोडणे हे शांतपणे, हळूहळू, सहजतेने करावे.
- पूरक-कुंभक-रेचक यांचे प्रमाण १:२:२ असावे. नुसते पूरक-रेचक असेल, तर तेही १:२ या प्रमाणात असावे.
- मूलबंध, उड्डीयानबंध आणि जालंधरबंध हे तीनही बंध कुंभक दीर्घ असेल, तर लावावेत. कुंभक दीर्घ नसेल, तर फक्त जालंधर बंध लावला तरी चालेल.
- प्राणायाम करतांना डोळे बंद ठेवावेत, म्हणजे बाहेरील प्रबळ संवेग बंद होतात आणि आतील घडामोडींवर लक्ष केंद्रित करण्यास साहाय्य होते.
प्राणायामाचे लाभ
- प्राणायामाने आकलनशक्ती वाढते.
- प्राणायामाने एकूणच मानसिक स्वास्थ्य चांगले होते.
- मनातील नकारात्मक आणि दुष्ट विचारांचा प्रभाव न्यून होतो.
- वागण्यात उदात्तता येते आणि व्यक्तीमत्त्व प्रभावशाली होते.
- मानसिक तणावांमुळे उद्भवणारे रोग जसे की, उच्च रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश, दमा इत्यादी मनोकायिक रोगांमध्ये आराम पडतो.
- प्राणायामाने फुफ्फुसांची क्षमता आणि लवचिकता वाढते.
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्राणायामाचा उपयोग होतो.
- हठयोगानुसार योग्य रीतीने प्राणायाम केल्यास अनेक रोग नाहीसे होतात.
प्राणायाम कसा करावा ?
प्राणायाम करण्यासाठी जाणीवपूर्वक, सुनियंत्रित, दीर्घ; परंतु योग्य प्रमाणात श्वास घेतला जातो. त्याला ‘पूरक’ असे म्हणतात. हेच मापदंड श्वास सोडतांना लावले जातात, त्यास ‘रेचक’ अशी संज्ञा आहे. पूरकानंतर किंवा रेचकानंतर काही क्षण श्वास रोखून धरला जातो. त्याला ‘कुंभक’ म्हणतात. साधारणपणे पूरक-कुंभक-रेचकासाठी १:२:२ आणि १:४:२ असे प्रमाण असते. ‘प्राणायामाची कमीतकमी १० आवर्तने करावीत’, असा संकेत आहे. प्राणायामानंतर ओंकार जप केल्यास ध्यान लवकर लागते.
आसन
योगशास्त्रात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी विविध आसने सांगितली आहेत. योगसाधनेमध्ये नाडीशोधनासाठी आसन करणे आवश्यक असते. आसनांमुळे शरीर निरोगी आणि चपळ होऊन प्राणायाम करणे सोपे होते. हठयोगाचे प्रथम अंग आसन आहे. हात आणि पाय एका विशिष्ट अवस्थेत ठेवून शरीर ताठ अन् स्थिर ठेवून आसनस्थ होऊन ध्यानधारणा केल्याने मन एकाग्र होण्यास साहाय्य होते.

आसन कसे असावे ?
‘ज्यामध्ये सुख आणि स्थिरता आहे त्याला आसन म्हणतात’, अशी पतंजलि यांनी आसनाची व्याख्या केली आहे. आसनात जागृतावस्था आवश्यक आहे. त्यामुळे झोपण्याच्या स्थितीस आसन म्हणता येणार नाही. प्राणायाम, ध्यान इत्यादींसाठी स्थिरता आणि सुख या दोहोंची आवश्यकता असते. आसनांमुळे ध्यान-धारणा आदींना अनुकूल अशी परिपक्वता येते.
सिद्धासन, पद्मासन, सिंहासन, भद्रासन इत्यादी विशिष्ट आसने साधकाला बंधांकडे आणि बंधांपासून कुंडलिनीच्या जागृतीकडे प्रेरित करतात.
आसनांचे वर्गीकरण
सध्या प्रचलित असणारी आसने ही काळाच्या ओघात विकसित झालेली आहेत आणि उत्तरोत्तर नवीन आसनांच्या निर्मितीला चालना मिळत आहे. आसनांची कृती आणि परिणाम यानुसार आसनांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते.
१. शरीरसंवर्धनात्मक आसने : उत्तम योगसाधनेसाठी विशेषतः ध्यानधारणेसाठी शरीर आणि मन यांची विशिष्ट योग्यता आवश्यक असते. हे पालट घडवून आणणारी आसने शरीरसंवर्धनात्मक आसने या वर्गात मोडतात. याचे उपवर्ग पुढीलप्रमाणे आहेत.
अ. मेरुदंडावर परिणाम करणारी आसने : भुजंगासन, धनुरासन, वक्रासन, उष्ट्रासन इत्यादी आसनांमुळे मेरुदंड प्रभावित होतो.
आ. शरीरांतर्गत अवयवांच्या संवेदनांवर परिणाम करणारी आसने : गोमुखासन, मत्स्यासन, वज्रासन, भद्रासन, सुप्तव्रासन, नौकासन इत्यादी आसने निरनिराळ्या अवयवांच्या संवेदनांवर परिणाम करतात.
इ. चेतासंस्था आणि ग्रंथी यांच्यावर परिणाम करणारी आसने : पश्चिमोत्तानासन, मत्स्येंद्रासन, भुजंगासन, हलासन, पवनमुक्तासन इत्यादी आसनांमुळे चेतासंस्थेस चालना मिळते, तसेच विशिष्ट ग्रंथींवर परिणाम होतो आणि त्यांचे कार्य सुधारते.
ई. शरीराच्या सुनियंत्रित कार्यासाठी आसने : शरीराच्या सुनियंत्रित कार्यासाठी शीर्षासन, सर्वांगासन, विपरीत करणी, वृक्षासन, कुक्कुटासन, बकासन आणि मयुरासन ही आसने सांगितली आहेत. यामुळे डोळे, कान आणि पायांचे तळवे यांचे कार्य सुरळीत होते.
उ. सुखकारक आसने : शवासन आणि मकरासन या आसनांचे उद्दिष्ट शारीरिक थकवा दूर करणे, शरीर आणि मन शिथिल करणे अन् त्यांना विश्रांती देणे, हे होय.
२. ध्यानोपयोगी आसने : ध्यानासाठी स्थिर आणि सुखकारक अशी बैठक महत्त्वाची असते. सिद्धासन, पद्मासन, समासन, स्वस्तिकासन ही आसने ध्यानासाठी योग्य आहेत.
(संदर्भ : समय-निरामय पंचांग, शालिवाहन शक १९४७)
स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन
‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या कुंडलिनी चक्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणे
आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ समजून घ्या !
‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या कुंडलिनीचक्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणे
वातावरणात पालट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस पाळायचे ५ नियम !
प्रसुतीनंतरची कमजोरी आणि स्त्री आरोग्य : आयुर्वेदाचे उपचार अन् मार्गदर्शन