विद्यावाचस्पती विद्यानंद लिखित २ आध्यात्मिक ग्रंथांचा लोकार्पण सोहळा पुणे येथे संपन्न

गुरूंच्या संकीर्तनाविना या जगात दुसरे काहीच शाश्वत नाही ! – पू. (सौ.) मनीषा पाठक

ग्रंथाचे अनावरण करताना ( डावीकडून ) चारुशिला बेलसरे, डॉ. अरविंद नेरकर, सनातनच्या संस्थेच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक, डॉ. सुमतीताई देशपांडे आणि लेखक विद्यावाचस्पती विद्यानंद

पुणे, १२ जून (वार्ता.) – गुरूंच्या संकीर्तनाविना या जगात दुसरे काहीच शाश्वत नाही. गुरूंची स्तुती, गुरूंची कीर्ती, गुरूंची महती आणि गुरूंचे कीर्तनच मनुष्याला तारून नेते. गुरु स्थूलदेहाने जरी वेगळे असले, तरी गुरुतत्त्वाने सर्व जोडलेले असतात, असे सनातनच्या संस्थेच्या १२३ व्या समष्टी संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी मार्गदर्शनात सांगितले. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी लिहिलेल्या ‘आध्यात्मिक जीवन : एक अंतर्मुख प्रवास’, ‘गुरुकृपा आणि आत्मबोध’ या २ आध्यात्मिक ग्रंथांच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या. ‘हा सोहळा शब्दांतून अनुभवण्यापेक्षा अंतरंगातून अनुभवण्याचा आहे. हा ग्रंथ लोकार्पणाचा कार्यक्रम असूनही कार्यक्रमामध्ये सर्वजण एकरूप आहेत. सर्व श्रद्धावंत जीव येथे उपस्थित आहेत. येथे सहजता आणि आनंद जाणवत आहे. सभागृहामध्ये प्रवेश केल्यावर गुरुभक्तीचा दैवी सुगंध आला’, असे त्यांनी या वेळी नमूद केले.

भेट द्या → https://www.facebook.com/people/Vidyavachaspati_Vidyanand/100064455168550/

या सोहळ्याला गायिका चारुशिला बेलसरे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर आणि प.पू. मुंगळे महाराजांचा (सद्गुरूंचा) बालपणीचा सहवास लाभलेल्या डॉ. सुमती देशपांडे मंचावर उपस्थित होत्या. या वेळी उपस्थित मान्यवरांना भेटवस्तू, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. गायिका चारुशीला बेलसरे यांना प.पू. गुळवणी महाराजांनी ‘शक्तिपात दीक्षा’ दिली, तर हृदयनाथ मंगेशकर यांनी ‘बाल लता’, ही उपाधी दिली आहे. डॉ. सुमतीताई देशपांडे यांनी सद्गुरु प.पू. मुंगळे महाराज यांच्या सहवासातील बालपणीच्या आठवणी कथन केल्या.

कार्यक्रमाला संत, साधक, मित्रपरिवार, शिक्षक, आप्तेष्ट, हितचिंतक आदी १०० हून अधिक जण उपस्थित होते. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या सद्गुरूंच्या, म्हणजेच प.पू. मुंगळे महाराज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ग्रंथ प्रकाशनाचा अनौपचारिक कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी सद्गुरूंविषयी लिहिलेले गौरवोद्गार, तसेच त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून केलेल्या लेखनाचे वाचन सनातन संस्थेच्या सौ. प्रीती कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. अतिशय भावपूर्ण आणि आनंददायी वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

श्री. शैलेश अनंत कुलकर्णी (लेखक) यांना त्यांचे सद्गुरु प.पू. मुंगळे महाराज यांनी ‘विद्यावाचस्पती विद्यानंद’ ही उपाधी बहाल केली होती.

विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी सद्गुरु प.पू. मुंगळे महाराज यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून लिहिलेल्या लेखनाचे सार

१. प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा ? याचा ज्ञानकोश म्हणजे प.पू. मुंगळे महाराजांचे जीवन होय.

२. नामाचे, ध्यानाचे, सद्गुरूंच्या कृपेचे आणि ईश्वरी इच्छेचे महत्त्व अन् माहात्म्य सांगून सद्गुरूंनी त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाच्या जीवनातील क्षण विलक्षण केले.

३. संपूर्ण ब्रह्मांडात चैतन्य निर्माण करणारे शब्द, लालित्य म्हणजे सद्गुरूंची प्रवचनेच होय.

४. नामाची गोडी आणि भगवंताची जोडी जेव्हा प्राप्त होते, तेव्हाच मनुष्य जगण्यापलीकडील जीवनाची अनुभूती प्राप्त करू शकतो.

५. काळ, वेळ, परिस्थिती या कशाचेच बंधन नामाला नाही.

६. प्रत्येक साधकाने साधना ही नियमित कर्तव्य समजून नित्य नियमाने, अंतर्मुख होऊन, आत्मभान जागृत ठेवून, आत्मिक आनंदासाठी केली पाहिजे आणि त्यासाठी सर्वप्रथम आत्मनिष्ठ होणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्यात नवचैतन्य, नवीन उमेद, नवा उत्साह आणि नवा जोश निर्माण होतो. त्यामुळे मनुष्याचा आत्मविश्वास वाढीस लागण्यास प्रारंभ होतो.

७. जीवनात घडलेली, घडणारी आणि घडत असलेली प्रत्येक गोष्ट ही ईश्वरेच्छेने होते.

८. देहबुद्धी मुळापासून जाळून टाकल्याने मनुष्याच्या आचारात, विचारात, उच्चारात, वर्तनात आणि व्यवहारात ‘मी’ अथवा ‘माझेपण’ दिसत नाही.

लेखक परिचय

विद्यावाचस्पती विद्यानंद

१. विद्यावाचस्पती विद्यानंद यांना सद्गुरु मुंगळे महाराज गुरु म्हणून लाभले. वर्ष २००० पासून त्यांची साधना चालू आहे. मागील ५ वर्षांपासून सायंकाळी ६.३० ते दुसर्‍या दिवशी सकाळी ११.३० पर्यंत १७ घंटे ते मौन साधना करतात. व्यावहारिक जीवनात त्यांनी वेगवेगळ्या विषयांच्या ३५ हून अधिक पदव्या प्राप्त केल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातही ते मोठ्या पदावर कार्यरत होते. लेखक विद्यावाचस्पती विद्यानंद यांनीच कार्यक्रमाचे निवेदन केले.

२. सनातन संस्थेचे प्रकाशन परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन (भाग १) मध्ये विद्यावाचस्पती विद्यानंदांचे गुरु प.पू. मुंगळे महाराज यांचे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, यांच्या समवेत असलेल्या छायाचित्राचा संदर्भ देऊन सनातन संस्था आणि दोन्ही गुरूंच्या चरणी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मन, चित्त हे सतत सद्गुरूंच्या चरणी ठेवावे ! – गायिका चारुशीला बेलसरे

या वेळी गायिका चारुशिला बेलसरे यांनी सांगितले की, गुरु, आई-वडील आणि परमेश्वर यांना वंदन केले पाहिजे. ज्यांच्याकडून आपण शिकतो, त्यांचे स्मरण सतत ठेवायला हवे. भक्तीयोग आणि नामयोग यांचा वटवृक्ष प्रत्येकाच्या मनी उभा राहून त्याच्या आत्मज्ञानाचा वृक्ष व्हायला हवा. मन, चित्त हे सतत सद्गुरूंच्या चरणी ठेवावे, तरच मनुष्यजन्माचे सार्थक होते.

मी वारीचा ‘अभ्यासक’ नसून ‘उपासक’ आहे ! – डॉ. अरविंद नेरकर

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर यांनी ‘पंढरपूर वारी आणि मराठी साहित्य’ यावर संशोधन केले. प्रपंचातून परमार्थ साधावा; मात्र परमार्थ हा चर्चेचा विषय नसून अनुभूतीचा विषय आहे, ही संतांची शिकवण सर्वांनी ध्यानात घ्यायला हवी. मी अनेक वर्षे वारी केली; पण मी वारीचा अभ्यासक नाही, तर उपासक आहे.

सनातन वैदिक संस्कृती आणि तिचे वैभव टिकवण्याचे निरंतर कार्य सनातन संस्था करते ! – विद्यावाचस्पती विद्यानंद

‘सनातन वैदिक संस्कृती आणि तिचे वैभव टिकवण्याचे निरंतर कार्य सनातन संस्था करत आहे. समाजातील विकृतींना नष्ट करून क्रियाशीलतेसाठी मिळणारी प्रेरणा टिकवून ठेवण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे’, असे सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी व्यक्त केले. सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी कार्यक्रमाला येण्यासाठी संमती दिली, याप्रती त्यांनी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

‘प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा ? याचा ज्ञानकोश म्हणजे प.पू. मुंगळे महाराजांचे जीवन होय. नामाचे, ध्यानाचे, सद्गुरूंच्या कृपेचे आणि ईश्वरी इच्छेचे महत्त्व अन् माहात्म्य सांगून सद्गुरूंनी त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाच्या जीवनातील क्षण विलक्षण केले’ इत्यादी स्वरूपाचे लिखाण विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी सद्गुरु प.पू. मुंगळे महाराज यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून केले आहे.