Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराममंदिराच्या शिखरावर स्थापन होणार सोन्याने मढवलेला कळस !

५ जून या दिवशी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन होणार

श्रीराममंदिराच्या शिखरावर स्थापित करण्यात आलेला सोन्याने मढवलेला कळस

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील भव्य श्रीराममंदिराच्या शिखरावर सोन्याने मढवलेला कळस स्थापित करण्यात आला आहे. ५ जून या दिवशी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये भगवान श्रीराम आणि सीता सिंहासनावर विराजमान असतील, तर भरत अन् हनुमान भगवान श्रीरामाच्या पायाजवळ बसले आहेत. यासाठीचे विधी ३ जूनपासून प्रारंभ होणार आहेत. राम दरबारासह ७ मंदिरांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ‘गंगा दशहरा’च्या दिवशी अभिजित मुहूर्तावर सकाळी ११ वाजता पूजा प्रारंभ होणार आहे. अयोध्या आणि काशी येथील १०१ आचार्य प्राणप्रतिष्ठेत सहभागी होणार आहेत. या वेळी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित रहाणार आहेत.

मंदिरात परिसरातील ६ मंदिरांमध्ये भगवान सूर्य, श्री गणेश, श्री हनुमान, भगवान शिव, माता भगवती आणि माता अन्नपूर्णा यांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. या मंदिरांमध्ये ५ जून या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याखेरीज सप्त मंडपात ७ मंदिरे बांधली आहेत. यामध्ये महर्षि वाल्मीकि, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, महर्षि वशिष्ठ, निषादराज, अहिल्या आणि शबरी यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.