बालाकोट ते ‘ऑपरेशन सिंदूर’ : वेगाने पालटत्या युद्धक्षेत्राचा भारतीय बाजूने घेतलेला आढावा !

‘ऑपरेशन सिंदूर’ने भावी युद्धाची वेगळीच चुणूक दाखवली आहे. या युद्धात पायदळाचा प्रत्यक्ष सहभाग नाही आणि हवाई युद्धात आजपर्यंत अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या लढाऊ विमानांनीसुद्धा मागे राहून स्वतःची भूमिका बजावली आहे. हा संपूर्ण भारत-पाकिस्तान संघर्ष अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, मानवरहित विमाने आणि ‘कामिकाझे सुसाईड ड्रोन’ यांनी केलेला संघर्ष आहे. याची भारतीय वायूसेनेने प्रकाशित केलेली प्रचंड माहिती आगामी काळात अत्यंत चित्तवेधक अशा पुस्तकांना मोठा खजिना म्हणून उपयोगी पडेल. वर्ष २०१९ चे ‘बालाकोट ऑपरेशन’ आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांच्यात पुष्कळ भेद आहे. त्याचा हा धावता आढावा…

१. बालाकोट कारवाई 

बालाकोट हवाई आक्रमणाच्या वेळी भारतीय लढाऊ विमानांनी वर्ष १९७१ नंतर पहिल्यांदा नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा पार करून पाकिस्तानात हवाई आक्रमणे केली. त्या वेळी पारंपरिक तंत्र वापरून प्रारंभीला काही विमाने (डीकॉय फायटर पॅकेजेस) काश्मीरवर उडून पाकिस्तानी हवाई हद्दीत गेली, त्याला प्रतिसाद म्हणून काही पाकिस्तानी विमाने तात्काळ ‘एयरबॉर्न’ (हालचालींसाठी सुसज्ज) झाली आणि भारतीय विमाने तात्काळ आपल्या हद्दीत परत आली. या ‘कॅट अँड माऊस गेम’मध्ये (उंदरा-मांजराच्या खेळामध्ये) निर्माण झालेल्या पोकळीमधून आधीच सिद्ध असलेली बाँबर विमाने पाकिस्तानी हवाई हद्दीत गेली आणि तिथून थेट बालाकोटवरच्या आकाशातून स्वतःची क्षेपणास्त्रे ठरलेल्या लक्ष्यांवर टाकून अरबी समुद्राच्या दिशेने जाऊन ग्वाल्हेरसह वेगवेगळ्या तळांवर जाऊन उतरली. समोरून येणारी विमाने आणि विमानवेधी यंत्रणा कुठे कुठे सक्रीय आहेत, हे सांगण्यासाठी ‘अर्ली वॉर्निंग अवाक्स विमाने’ अर्थात् सहस्र किमीची रेंज असलेली अवाढव्य उडणारी रडार यंत्रणा त्या वेळी भारतीय आकाशात उडत होती ती सतत पाकिस्तानच्या हद्दीतील सक्रीय ‘कॉम्बॅट/ बाँबिंग मिशन’वर (लढाऊ यंत्रणेवर) असलेल्या विमानांना माहिती पुरवत होते.

याखेरीज अचूक लक्ष्य भेद आणि शत्रूच्या विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी अन् परतीच्या प्रवासात वेगळा सुरक्षित ‘एअर डिफेन्स गॅप’वाला (हवाई संरक्षण अंतर) मार्ग दाखवण्यासाठी हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया या अमेरिकन तळावरील विमाने भारतीय लढाऊ विमानांना साहाय्य करत होती, अशी माहिती नंतर बाहेर आली.

फक्त ६ वर्षांपूर्वी हवाई युद्धाची ही स्थिती होती. त्यानंतर आतापर्यंत झालेले पालट डोळे दिपवणारे आहेत. काय पालट झाले, यासाठी आपल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’मधील केवळ एका कारवाईचा अभ्यास केला, तरी पुरेसे आहे.

विनय जोशी

२. ‘ऑपरेशन सिंदूर’ : पाकिस्तानच्या ‘भोलारी डिफेन्स एअरबेस’वरील (हवाई संरक्षण तळावर) आक्रमण 

सध्याच्या ‘ऑपरेशन’मध्ये (मोहिमेत) भारतीय लढाऊ विमानांनी एकदाही पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश केला नाही; पण भारतीय क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमाने यांनी पाकिस्तानी कानाकोपर्‍यात शब्दशः मुक्तसंचार केला; मनाला येईल त्या ‘डिफेन्स एअरबेस’वर आक्रमणे केली आणि यात एकदाही एकही क्षेपणास्त्र, मानवरहित विमान पाकिस्तानमधील ‘चायनीज एअर डिफेन्स सिस्टम’ (चीनची हवाई संरक्षण यंत्रणा) पाडू शकली नाही !

भारतीय क्षेपणास्त्रांची आक्रमणे अचूक, भीषण आणि विनाशकारी होती. त्यांनी पाकिस्तानला मोठ्या सामरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक वेदना दिलेल्या आहेत.

भारतीय वायूसेनेने काय पातळीवर जाऊन या कारवाया केल्या, याचा अंदाज येण्यासाठी आपण ‘भोलारी डिफेन्स एअरबेस’वरच्या आक्रमणाकडे थोडक्यात बघू.

अ. ‘साब २००० एरिये अर्ली वॉर्निंग अवाक्स विमान’ची कशी हानी केली ? : ही विमाने ९० फूट लांब आणि ४० फूट रुंद असतात. एकदा उड्डाण केल्यावर सलग १० घंटे आकाशात राहू शकतात आणि त्या काळात ३०० डिग्रीपर्यंत चारही बाजूंनी सहस्र किमीपर्यंत आपल्या दिशेने येणारी विमाने अन् क्षेपणास्त्रे यांच्यावर लक्ष ठेवून ती स्वतःच्या ‘फायटर’ (लढाऊ) आणि ‘एअर डिफेन्स फॉर्मेशन’पर्यंत (हवाई संरक्षण निर्मितीपर्यंत) त्याची माहिती पुरवतात. ही विमाने स्वतः निःशस्त्र आहेत; पण यामुळे शत्रूच्या विमानांवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येते. त्यामुळे भारतीय वायूसेनेसाठी ही सगळ्यात मोठी डोकेदुखी होती.

‘ऑपरेशन सिंदूर’ चालू झाल्यापासून आपल्या पश्चिम भागातील एका ‘एअर फोर्स बेस’वरून (हवाई दलाच्या तळावरून) पाकिस्तानच्या ४ ‘साब २०००’ विमानांवर अखंड आणि बारीक लक्ष ठेवले जात होते. त्याच्या फिरण्याच्या पद्धतींचा अभ्यास करून आक्रमणे चालू होती आणि ‘डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स’ने (हवाई कारवायांचे महासंचालक) या ‘साब २०००’ना ‘हाय व्हॅल्यू टार्गेट’ (उच्च मूल्यांचे लक्ष्य) म्हणून सूचीत ठेवले होते. याचा अर्थ संधी मिळताच याच्यावर निर्णायक आक्रमण करायची योजना होती.

१० मे या दिवशी दुपारी १२ वाजता भारतीय वायूसेनेच्या ‘सर्व्हिलन्स कमांड’ने (टेहळणी कक्षाने) पाकिस्तानी वायूसेनेच्या ‘कामरा’ (एंजेल्स तिसरी स्क्वॉड्रन, नाव : ‘ओव्हरलोर्ड ३’) बेसवरून कित्येक घंट्यांपूर्वी उडालेल्या ‘साब २००० एरिये’ विमानाला ‘भोलारी डिफेन्स एअर बेस’ (जिथून ‘ऑपरेशन बुनिययान उल मररूस’साठी विमाने उड्डाण करत होती) उतरतांना बघितले. अत्यंत महत्त्वाच्या लक्ष्य सूचीमध्ये ते असल्याने याच्या उतरण्याची बातमी आणि माहिती ‘डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स’ला तात्काळ देण्यात आली. तोपर्यंत भारतीय क्षेपणास्त्रांच्या आक्रमणाच्या भीतीने हे विमान बेसच्या अवाढव्य हँगरमध्ये पार्क करण्यात आले आणि तंत्रज्ञ, वैमानिक त्यात हाती लागलेली माहिती काढून घेणे, ही कामे करण्यात गर्क झाले. ‘आता आपण सुरक्षित आहोत’, या भावनेने पुढच्या उड्डाणासाठी ‘ग्राउंड स्टाफ’ (लढाऊ विमानांच्या तळावरील कर्मचारी) विमानात इंधन भरून पुढच्या सिद्धतेला लागला !

इकडे भारतात या सगळ्या ‘साब २०००’वर सतत लक्ष असणार्‍या ‘कमांड सेंटर’ने (नियंत्रण कक्षाने) ते हँगरमधून बाहेर येत नाही ना, यावर लक्ष ठेवायला प्रारंभ केला, तोपर्यंत ‘डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स’ यांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते आणि ‘भोलारी एअर बेस’च्या ‘साब २०००’च्या ‘हँगर’च्या छतावर एक घातक क्षेपणास्त्र येऊन आदळले. माहिती काढून घेणारे आणि नवीन उड्डाणासाठी विमानाला सज्ज करणारे असे सगळे तंत्रज्ञ, वैमानिक, कामगार अन् २५ ते ३० कोटी रुपयांचे ‘साब २००० एरिये’ यांची आहुती पडली !

३. नवीन युग, नवीन युद्ध तंत्र !

‘साब २००० एरिये’च्या ‘भोलारी डिफेन्स एअर बेस’वरील नाशासारखी मागच्या आठवड्यात झालेल्या प्रत्येक आक्रमणाची एक वेगळी कथा असेल आणि प्रत्येक आक्रमणात एक वेगळे तंत्र असेल. अशा एकेक कारवाईत शेकडो ॲनालिस्ट (विश्लेषक), सहस्र कोटींची यंत्रे आणि उपकरणे, शेकडो/ सहस्रो किमीच्या कक्षेत अखंड सक्रीय असतात. नुसती कोट्यवधीची यंत्रे घेऊन युद्ध लढता किंवा जिंकता येत नाही, हे परत परत सिद्ध होत आहे. सतत प्रशिक्षण, संशोधन, मन लावून काम आणि निष्ठेने कार्यवाही ही यातील यशाची गुरुकिल्ली आहे.

अशा एकेका युद्धात भौतिक, रसायन, अर्थशास्त्र, हवामान शास्त्र, राष्ट्रवाद, ‘जियोपॉलिटिक्स’ (भू राजकीय), ‘इंटेलिजन्स’ (गुप्तचर), ‘स्पेस सायन्स’ (अवकाश शास्त्र), उद्योगजगत, सगळ्याच्या वर संतुलित सैनिकी नेतृत्व अन् त्याच्यावर पोक्त राजकीय नेतृत्व आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे एक विचारधारा असलेली सूज्ञ जनता, अशी एक दीर्घ साखळी असलेली गुंतवणूक आहे.

आधुनिक जगातील कोणत्याही सैनिकी संघर्षात अशा अत्यंत गुंतागुंतीच्या उच्च कोटीच्या किचकट, अदृश्य तांत्रिक गोष्टी सहभागी असतील. त्यांच्याकडे बघण्यासाठी देशातील जनतेने ‘जिओपॉलिटिक्स’, संरक्षण इत्यादी क्षेत्रात लवकरात लवकर ‘साक्षर’ होण्याची आवश्यकता आहे !

– विनय जोशी, ‘इन्स्टिट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट रिसर्च अँड रिझोल्यूशन’, देहली.