‘सूर्याचे अवतरण अंधःकाराचा नाश करते आणि चंद्राचे अवतरण आल्हाद प्रदान करते. ६ मे १९४२ या दिवशी काळाने एका महापुरुषाला जन्माला घातले. या महापुरुषाचा जन्मही सूर्याप्रमाणे अधर्मरूपी अंधःकाराचा नाश करून सनातन धर्मराज्याची (ईश्वरी राज्याची, हिंदु राष्ट्राची) स्थापना करण्यासाठी, तसेच चंद्राप्रमाणे साधक अन् भक्त यांच्यावर गुरुकृपेचा आल्हाददायी वर्षाव करून त्यांना मोक्ष प्रदान करण्यासाठी झाला ! या महापुरुषाचे, म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले (गुरुदेव) यांचे हे संक्षिप्त चरित्र ! ‘अखिल मानवजातीला गुरुदेवांचे माहात्म्य कळावे आणि त्यांच्या शिकवणीनुसार साधना करून ती आनंदी व्हावी’, हा या ग्रंथाचा प्रधान हेतू आहे.
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
सनातनचा नूतन ग्रंथ प्रकाशित !

गुरुदेवांचे व्यक्तित्व, कर्तृत्व अन् अवतारत्व यांचे विविध पैलू !
ग्रंथाचे मनोगत

ख्यातनाम संमोहन-उपचारतज्ञ असलेले डॉ. आठवले यांना आरंभी अध्यात्मात विशेष रस नव्हता; मात्र अध्यात्माचे महत्त्व कळल्यावर त्यांनी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास आणि साधना केली. त्यांच्या तळमळीमुळे त्यांना वर्ष १९८७ मध्ये इंदूरचे थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या रूपात गुरुप्राप्ती झाली. त्यांनी गुरुचरणी तन-मन-धन अर्पून परिपूर्ण सेवा केली. गुरूंनी त्यांचा आध्यात्मिक अधिकार विविध प्रकारे लक्षात आणून दिला, उदा. वर्ष १९९२ मध्ये गुरु म्हणाले, ‘(साधकांनो,) तुम्ही डॉक्टरांना संत आणि गुरु मानले पाहिजे !’ डॉ. आठवले यांचा ‘साधक’ ते ‘उत्तम शिष्य’ हा बोधप्रद प्रवास या ग्रंथाद्वारे कळतो.
गुरूंनी डॉ. आठवले यांना समष्टी साधनेसाठी, म्हणजेच धर्मप्रसाराच्या कार्यासाठी अनेक आशीर्वाद दिले. यानंतर डॉ. आठवले यांनी धर्मप्रसाराचे कार्य अनेक पटींनी वाढवले. त्यांनी अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांसंबंधी बहुविध अंगांनी जे कार्य केले, त्याला तोड नाही. अध्यात्मप्रसार शीघ्रतेने होण्यासाठी वर्ष १९९९ मध्ये त्यांनी ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली. त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणूनच आज सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे ! जिज्ञासूंना अध्यात्मशास्त्रातील उच्च शिक्षण मिळून ईश्वरप्राप्तीच्या विविध मार्गांविषयी मार्गदर्शन होण्यासाठी वर्ष २०१४ मध्ये गुरुदेवांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना केली. गुरुदेवांकडून प्रेरणा घेऊन ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘मंदिर महासंघ’ या संस्थाही स्थापन झाल्या असून त्याही जोमाने कार्यरत आहेत.
गुरुदेवांनी धर्म, अध्यात्म, धर्मरक्षण, हिंदु राष्ट्राची स्थापना अशा विविधांगी विषयांवर एप्रिल २०२५ पर्यंत २७० ग्रंथ-लघुग्रंथांचे स्वत: संकलन केले असून ९६ ग्रंथ-लघुग्रंथांच्या संकलनाच्या सेवेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. गुरुदेवांनी अजून ५,००० हून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील, एवढ्या लिखाणाचा संग्रहही केला आहे. ‘अध्यात्म विज्ञानाच्या परिभाषेत समजावणे’, हे या ग्रंथांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
गुरुदेवांनी वर्ष १९९८ मध्ये आध्यात्मिक अधिष्ठानावर आधारित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उद्घोष केला ! भारतात ‘निधर्मीवादा’चा अतिरेक झालेला असतांनाच्या काळात त्यांनी सर्वप्रथम ही सिंहगर्जना केली होती ! त्यासाठी त्यांनी सार्वजनिक सभा घेणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके चालू करणे, संतांचे संघटन करणे आदी कार्ये केली. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनीही गुरुदेवांविषयी पुढील गौरवोद्गार काढले आहेत, ‘‘परम श्रद्धेय डॉ. आठवले या सत्पुरुषाने गोव्यात बसून तपाला आरंभ केला आणि संपूर्ण राष्ट्राला व्यापून टाकणारी ऊर्जा अन् चैतन्य निर्माण केले. त्यामुळे राष्ट्रामध्ये सनातन धर्माच्या जयघोषाला आरंभ झाला आहे !’’
गुरुदेवांना राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित कोणतेही कार्य करणार्यांविषयी आत्मीयता वाटते. त्यामुळे अशांनाही गुरुदेव साधकांप्रमाणे मार्गदर्शन करू शकतात. गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे आज अनेक धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आदी त्यांना गुरुस्थानी मानू लागले आहेत.
यासह गुरुदेवांनी साधकांना शीघ्र ईश्वरप्राप्ती होण्यासाठी केलेली ‘गुरुकृपायोग’ या अभिनव योगमार्गाची निर्मिती, आश्रमांचे निर्माणकार्य यांसारख्या विविध कार्यांचा गोषवारा या ग्रंथात घेतला आहे. गुरुदेवांच्या या कार्यांची फलश्रुती काय ?
गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून १०.४.२०२५ पर्यंत १३१ साधक संत झाले असून १,०५३ साधक संत बनण्याच्या मार्गावर आहेत ! तसेच सहस्रो साधक राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात अग्रेसरही आहेत. विविध सांप्रदायिक, धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आदींनाही गुरुदेवांचे हे सर्व कार्य निश्चितच स्फूर्तीप्रद अन् मार्गदर्शक ठरते आहे.
हे गुरुदेवांच्या स्थुलातील कार्याविषयी झाले. त्यांचे स्थुलातील कार्य ३० टक्के असून, सूक्ष्मातील कार्य ७० टक्के आहे ! ‘सूक्ष्म’ म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी जाणण्याच्या पलीकडील विषय. ‘गुरुदेव ईश्वराशी एकरूप होत चालले असल्याने त्यांचेही कार्य ईश्वराप्रमाणे अधिकाधिक सूक्ष्म स्तरावर, ब्रह्मांडव्याप्त कसे बनत चालले आहे ? हिंदु राष्ट्र स्थुलातून स्थापन होण्यात सर्वांत मोठा अडथळा असणार्या वाईट शक्तींशी गुरुदेव सूक्ष्मातून लढा कसा देत आहेत ?’ आदींवरून गुरुदेवांच्या सूक्ष्मातील कार्यांची ओळख होते.
गुरुदेवांच्या साधनेमुळे त्यांच्यातील वाढलेले चैतन्य आणि निर्गुण तत्त्व यांमुळे त्यांचा देह, त्यांच्या वापरातील वस्तू अन् ते रहात असलेली वास्तू यांमध्येही पंचतत्त्वांच्या स्तरावर बुद्धीअगम्य पालट होत आहेत. अशा पालटांचा संशोधनात्मक अभ्यास करणारे गुरुदेव एकमेवच आहेत ! हे पालट आणि त्यांमागील शास्त्र, हेही या ग्रंथाचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे.
‘नाडीभविष्य (नाडीपट्टीवाचन)’ हे एक प्रगल्भ ज्योतिषशास्त्र आहे. या नाडीपट्ट्यांमध्ये सहस्रो वर्षांपूर्वीच गुरुदेवांचे अवतारमाहात्म्य लिहून ठेवलेले आहे. गुरुदेवांचे हे अवतारमाहात्म्य म्हणजे त्यांच्या चरित्रात सुवर्णाक्षरांत लिहिला जाईल असाच अध्याय !
‘गुरुदेवांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साध्य होऊ नये’, यासाठी वाईट शक्तींनी वर्ष १९८२ पासून गुरुदेवांवर आक्रमणे करण्यास आरंभ केला आणि बर्याचदा त्यांच्यावर महामृत्यूयोगाची संकटेही आणली; मात्र संत आणि नाडीपट्ट्यांच्या माध्यमातून प्राचीन महर्षि यांनी गुरुदेवांना वेळोवेळी साहाय्य केले. वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे काही वर्षांपासून गुरुदेवांना पुष्कळ थकवा असणे आदी विविध शारीरिक त्रास होत आहेत. असे असतांनाही केवळ समष्टीच्या कल्याणासाठी ते कार्यरत आहेत. यातूनही त्यांच्या दैवीपणाची साक्ष पटते.
श्री गुरुचरणी प्रार्थना !
‘गुरुदेवांसारख्या अवतारी विभूतीच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याची संधी आपल्याला लाभत आहे, हे आपले महत्भाग्यच आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून प्रत्येकानेच आपल्या जन्माचे खर्या अर्थाने सार्थक करावे’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– (पू.) संदीप आळशी, सनातनचे संत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१०.४.२०२५)
सनातनच्या ग्रंथांची ‘ऑनलाईन’ खरेदी आणि ई-बुक यांसाठी SanatanShop.com
संपर्क : (०८३२) २३१२६६४
|
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !