‘ऑपरेशन सिंदूर’वरून काँग्रेसचा फुकाचा आरोप

नवी देहली – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी हे मान्य केले आहे की, त्यांनी हवाई आक्रमणापूर्वी पाकिस्तानला माहिती दिली होती. यामुळे आपण किती विमाने गमावली हे सरकारने सांगावे. ही चूक नव्हती, तो एक गुन्हा होता आणि देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे, अशी मागणी काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत केली. यापूर्वी राहुल गांधी यांनीही अशीच मागणी केली होती. त्यानंतर आताही त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत विचारले की, या संदर्भात परराष्ट्रमंत्र्यांचे मौन निषेधार्ह आहे आणि यामुळे सर्व काही स्पष्ट होते. मी पुन्हा विचारेन की, त्यांना हे करण्याचा अधिकार कुणी दिला, त्यांच्या असे केल्याने आपल्या वायूदलाची किती विमाने पाडली गेली ?
वस्तूस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहे ! – परराष्ट्र मंत्रालय
परराष्ट्र मंत्रालयाने राहुल गांधी यांच्या मागणीवर म्हटले आहे की, तथ्ये चुकीच्या पद्धतीने सादर केली जात आहेत. परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रारंभीच्या टप्प्यात चेतावणी देण्याविना कोणतीही माहिती नव्हती. वस्तूस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहे.’
डीजीएमओ (‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन’ – सैनिकी कारवाईचे महासंचालक) राजीव घई म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रारंभ झाल्यानंतर आम्ही पाकिस्तानला चेतावणी दिली होती की, आम्ही आतंकवादी तळांवर आक्रमण करू. पाकिस्तानने वाटाघाटी करण्यास नकार दिला आणि सूड घेण्याची धमकी दिली.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसला काहीच सापडले नाही; म्हणून अशा प्रकारचा आरोप करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे, हे जनतेला दिसत आहे ! |