मूळव्याध (Piles) होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

‘गुदद्वाराच्या आतल्या आणि बाहेरच्या रक्तवाहिन्यांना आलेली सूज, म्हणजेच मूळव्याध होय. भारतीय लोकांचा पालटलेला आहार आणि पालटलेली जीवनशैली यांमुळे सध्या भारतियांमध्ये मूळव्याधीचे प्रमाण वाढत आहे. या लेखात आपण ‘मूळव्याधीचे प्रकार, लक्षणे, मूळव्याध होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय’ पहाणार आहोत.

लेख क्रमांक : ८

१. मूळव्याधीचे प्रकार

अ. गुदद्वाराच्या आतल्या बाजूला होणारी मूळव्याध

आ. गुदद्वाराच्या बाहेरच्या बाजूला कोंब येणे

गुदद्वाराच्या आतल्या बाजूस असलेल्या मूळव्याधीचा कधीतरीच त्रास होतो; पण बाहेर कोंब असल्यास त्याचा त्रास अधिक होतो.

२. मूळव्याधीची लक्षणे

अ. बाहेरच्या बाजूला असलेल्या मूळव्याधीमध्ये खाज येणे

आ. तेथील त्वचा कोरडी पडणे

इ. पोट साफ होतांना वेदना होणे

ई. पोट साफ होतांना काही वेळा रक्त येणे

उ. त्रास अधिक वाढल्यास आसंदीवर किंवा कडक जागेवर बसता न येणे

३. मूळव्याधीची कारणे

डॉ. दीपक जोशी

अ. आतड्यांची अस्वस्थता (पोटात दुखणे, पोट फुगणे, मळमळणे, बद्धकोष्ठता, अतिसार, सूज येणे, पेटके येणे इत्यादी समस्या), तसेच गुदाशय किंवा गुदद्वार यांत आलेला कडकपणा

आ. मल बाहेर पडतांना तो कडक असेल, तर गुदद्वाराला ताण पडून मूळव्याध होते.

इ. खाण्या-पिण्याच्या पालटलेल्या सवयी

ई. पिझ्झा, बर्गर यांसारखे जड पदार्थ, तसेच ‘चायनीज फूड’ खाणे

उ. मैद्याचे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे

ऊ. हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या अल्प खाल्ल्यानेही पोटाचे त्रास चालू होऊन मूळव्याध होऊ शकते.

४. मूळव्याधीवरील उपाय

अ. प्रतिदिन जेवणामध्ये ४ – ५ सुरणाचे काप तिखट-मीठ लावून ‘हाफ फ्राय’ करून (अधर्वट तळून) चावून चावून खाणे

आ. जेवणात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या यांचा वापर अधिक प्रमाणात करणे

इ. रात्री जेवतांना चिरलेला एक कांदा १ वाटी (आंबट नसलेल्या) दह्यात घालून खावा. असे ११ दिवस करावे. त्यानंतर ५ दिवस थांबून पुन्हा ११ दिवस हा प्रयोग करावा. त्रास न्यून झाल्यावर हा उपचार बंद करावा.

ई. दिवसभरात पुरेसे पाणी पिणे

उ. रात्री त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासह घेणे आणि त्यासह एक चमचा गायीचे तूप घेणे. चूर्णाचे प्रमाण पुढीलप्रमाणे हळूहळू न्यून करत जावे. पहिल्या मासात एक चमचा (५ ग्रॅम), दुसर्‍या मासात पाऊण चमचा (४ ग्रॅम), तिसर्‍या मासात अर्धा चमचा (३ ग्रॅम), चौथ्या मासात पाव चमचा (२ ग्रॅम), अशा प्रकारे चूर्णाचे प्रमाण न्यून करत जाऊन चूर्ण घेणे बंद करावे.’

– डॉ. दीपक जोशी, निसर्गोपचार तज्ञ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स), देवद, पनवेल. (१८.२.२०२५)