(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना वस्त्रांसंबंधीची नियमावली)
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वस्त्रसंहितेच्या नियमावलीचे भाविकांकडून सकारात्मक स्वागत !

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी येतांना पारंपरिक वेशभूषा परिधान करावी, असा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. १३ मेपासून या निर्णयाची कार्यवाही चालू झाली. याअंतर्गत अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर येथे जे भाविक बर्म्युडा, शॉर्ट पँट (लहान विजार), केप्री, बिना बाह्यांचा पोशाख घालून आले होते, त्यांना देवस्थानच्या वतीने पुरवण्यात आलेले धोतर नेसून, तसेच उपरणे पांघरूनच मंदिरात प्रवेश देण्यात आला. नियमावली लागू झाल्याचा दुसराच दिवस असल्याने देवस्थानच्या वतीने परगावच्या भाविकांसाठी तात्पुरते वस्त्र देण्याची सुविधा दिली; मात्र येत्या आठवड्यापासून ही सुविधा बंद करण्यात येईल आणि पारंपरिक कपडे परिधान करणे बंधनकारक केले जाईल, अशी माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली.
१४ मे या दिवशी अंबाबाई मंदिरातील मुख्य दर्शन रांग असलेल्या पूर्व दरवाजा, घाटी दरवाजा, दक्षिण दरवाजा आणि महाद्वार येथील प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षकांकडून तोकड्या कपड्यांतील भाविकांना वस्त्रसंहितेच्या नियमावलीची माहिती अन् वस्त्र देण्यात येत होते. अंबाबाई मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याच्या निर्णयाचे विविध ठिकाणांतील भाविकांनी स्वागत केले.