१. मृत्यूच्या केवळ विचारानेही लोकांची भयग्रस्त अवस्था होणे

समाजात ‘मृत्यू’ म्हणजे एक भीतीदायक गोष्ट असल्यासारखे त्याच्याकडे पाहिले जाते. मृत्यू या संकल्पनेचा मनावर भयानक पगडा असलेले लोक जिवंतपणीच मृत्यूच्या भयाच्या सावटाखाली प्रतिदिन वावरत असतात. मृत्यूचे आनंदाने स्वागत करणे, तर दूरच; परंतु त्या विचारापासूनही दूर पळण्याचा सगळेच प्रयत्न करत असतात. अगदी ‘भगवतगीते’त श्रीकृष्णाने जन्म-मृत्यू म्हणजे ‘जुनी वस्त्रे त्यागून नवीन ग्रहण करणे’, असे जरी सांगून मानवाला मृत्यूभयापासून आश्वस्त केलेले असले, तरी सर्वसामान्यांना ते केवळ तत्त्वतःच पटलेले असते. व्यवहारात मात्र मृत्यूच्या केवळ विचारानेही लोकांचे मनोदौर्बल्य वाढून भयग्रस्त अवस्था होते.
२. गुरूंच्या कृपाशीर्वादाने आणि साधनेतील सातत्याने जन्म-मृत्यूच्या बंधनातून बाहेर पडणे शक्य असणे
योग्य प्रकारे साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून बाहेर पडता येते, हे ज्यांना ठाऊक आहे, त्यांच्यासाठी मात्र जीवनाप्रमाणेच मृत्यूही ‘वरदानच’ ठरतो. जीवनात येऊन शाश्वत आनंद घेण्याची गुरुकिल्ली त्यांना योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली लाभलेली असते. गुरूंच्या कृपाशीर्वादाने आणि साधनतील सातत्याने ते ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ या जन्म-मृत्यूच्या शृंखलेच्या बंधनातून अगदी सहजगत्या सुटतात. त्यांच्यासाठी मरण ‘आनंदाचा सोहळा’च असतो आणि आनंदसोहळा उपभोगतांना कुणाला बरे वाईट वाटेल ?
३. मृत्यूची आनंदाने वाट पहाणार्या आनंदयात्रींना मृत्यूची काय काळजी ?
जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका होण्यासाठी, म्हणजेच मोक्षप्राप्तीसाठी प्रत्येक प्राणीमात्राला पुनःपुन्हा जन्म घ्यावा लागून आपले संचिताचे गाठोडे अल्प अल्प करायचे असते. हे गाठोडे अल्प करण्यासाठीच ‘स्वभावदोष आणि अहं’ यांचे निर्मूलन होऊन मनाची स्थिरावस्था गाठणे आवश्यक आहे. ती केवळ साधनेनेच प्राप्त होते. जेव्हा मन स्थिरावते, तेव्हा ती निर्विचार अवस्थाच त्याला शाश्वत आनंदाप्रत, म्हणजे ईश्वरापर्यंत नेते. (मनोलय आणि बुद्धीलय होऊन तो सच्चिदानंद स्वरूप ईश्वराशी एकरूप होतो.) ही ईश्वरप्राप्ती ज्याला झाली, त्याला मरणाचे काय भय ? असून देही, तो विदेहीच असतो. पृथ्वीवरील त्याचे उर्वरित प्रारब्ध आनंदाने उपभोगत तो आनंदयात्री आनंदाच्या चिरप्रवासासाठी, परलोक गमनासाठी आतुरलेला असतो. ही आनंदमरणाची अवस्थाच किती सुखदायी आहे ! अशांना मृत्यूचे भय ते काय ? उलट ते म्हणतात, ‘मृत्यूची आम्हा काय क्षिती (काळजी) ? आम्ही तो आनंदयात्री !’
– श्रीमती रजनी साळुंके, फोंडा, गोवा.