पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषेचे विधेयक मांडून मराठीला मानाचे स्थान द्या !

बोरी येथील गोमंतक मराठी साहित्य संमेलनात ठराव

फोंडा, २२ जून (वार्ता.) – राज्यात मागील बराच काळ प्रलंबित असलेला मराठी राजभाषेचा प्रश्‍न सोडवण्यासाठी राजकीय शक्ती वापरून येत्या पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषेचे विधेयक मांडून मराठीला मानाचे स्थान द्यावे, असा ठराव बोरी येथील गोमंतक मराठी साहित्य संमेलनातील समारोप सोहळ्यात एकमताने संमत झाला. या संमेलनाच्या समारोप सोहळ्याला संमेलनाध्यक्ष विठ्ठल गावस, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. स्वाती महाळंक, सुनील सावकार, उत्तर रेडकर, सुहास बेळेकर, विनोद नाईक, किसन फडते, उत्कर्ष प्रभु आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

या वेळी विठ्ठल गावस म्हणाले, ‘‘गोव्यात मराठीला राजभाषेचे स्थान मिळायलाच हवे. त्यासाठी निर्णायक लढा चालू असून सरकारने हा प्रश्‍न निकाली काढतांना येत्या पावसाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक संमत करावे.’’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. स्वाती महाळंक म्हणाल्या, ‘‘मराठी आणि कोकणी भाषांचे नाते अतूट आहे. महाराष्ट्र आणि गोव्याची सांस्कृतिक जडणघडण एकसारखी असून मुळात गोव्यात कोकणीसमवेत मराठीही नांदत असतांना आणखी वाद कशाला हवा. त्यामुळे मराठी राजभाषेचा विषय संपुष्टात आणतांना मराठीच्या अधिक समृद्धतेसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करूया.’’

समारोप कार्यक्रमात उत्तम रेडकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्रद्धा गवंडी यांनी केले, तर रमेश वंसकर यांनी आभार मानले. कवी संमेलन आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाची सांगता झाली. हे ३० वे संमेलन २० आणि २१ जून असे २ दिवस बोरी येथील श्री नवदुर्गादेवीच्या प्रांगणात झाले. या संमेलनास गोमंतकातील मराठी साहित्यिक आणि मराठीप्रेमी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.