महाराणा प्रताप यांचा आदर्श समोर ठेवून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

महाराणा प्रताप

सातारा, २२ जून (वार्ता.) – हिंदु सूर्य महाराणा प्रताप हे खर्‍या अर्थाने धर्मवीर होते. त्या वेळच्या समकालीन राजांनी अकबराचे मांडलिकत्व पत्करले होते; मात्र हिंदु सूर्य महाराणा प्रताप यांनी कोणतीही तडजोड न करता देव, देश आणि धर्म यांच्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलीदान दिले. स्वसुख तृणवत मानून त्यांनी स्वाभिमानाने जंगलात रहाणे पसंत केले. आपणही महाराणा प्रताप यांच्याप्रमाणे देव, देश आणि धर्म रक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांनी केले. येथील बसाप्पा पेठेत हिंदु सूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर अखिल भारतीय हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता दत्तात्रय सणस, ‘श्री महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती’चे संजय परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. डाफळे म्हणाल्या, ‘‘पूर्वीही महिला असुरक्षित होत्या. चित्तोडगड आणि राणी पद्मिनी यांचा जाज्वल्य इतिहास आपल्यासमोर उभा रहातो. क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिलजीच्या हाताचा स्पर्श स्वतःच्या शरिराला होऊ नये; म्हणून राणी पद्मिनी यांनी १६ सहस्र महिलांसह जोहार केला होता. आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आपल्या मुली धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’सारख्या फसव्या प्रेमाच्या ‘षड्यंत्रा’ला भुलत आहेत. पुढे त्यांच्याशी विवाह करून त्यांचे बळजोरीने धर्मांतर केले जाते. अशी एक ना अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. या प्रसंगातून वाचायचे असेल, तर धर्मशिक्षण घेणे, संघटित होणे आवश्यक आहे.’’