‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

तुटलेली विद्युत् तार दुरुस्ती करण्याच्या विनंतीकडे ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांनी केले दुर्लक्ष !

केडगाव (जिल्हा पुणे) – दौंड तालुक्यातील केडगाव येथे २२ जूनला घडलेल्या दुर्दैवी घटनेत यश जगताप या २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृत युवकाच्या कुटुंबियांनी केला आहे. १५ दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या वादळी वार्‍यासह पावसामुळे जगताप यांच्या शेतामध्ये विद्युत् तार तुटून पडली होती. हे ग्रामस्थांसह जगताप कुटुंबियांनी वारंवार ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले होते. संबंधित तार तातडीने दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली होती; मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर एका तरुणाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी किरण देशमुख यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या घटनेनंतर केडगाव परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी शेतातील अन् गावातील धोकादायक अवस्थेतील विद्युत् तारा, तसेच खांबांची तातडीने पडताळणी करून दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • केवळ कागदी घोडे नाचवणार्‍या आणि केवळ वीजदेयक वसुलीसाठी तत्परता दाखवणार्‍या ‘महावितरण’च्या संबंधित दोषी अधिकार्‍यांवर यवत पोलिसांनी तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
  • प्रशासनाने आतातरी जागे होऊन केडगाव परिसरातील सर्वच धोकादायक विद्युत् तारा आणि खांबांची तात्काळ दुरुस्ती करावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही !