कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत

पणजी, २२ जून (वार्ता.) – कदंब वाहतूक महामंडळाने वाहक आणि अवजड वाहनचालक यांच्या ३०० कंत्राटी जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून आल्तो पर्वरी येथील मुख्यालयात थेट मुलाखतींसाठी (वॉक इन) अर्ज मागवले आहेत. जाहिरातीनुसार,  कदंब वाहतूक महामंडळ कंत्राटी तत्त्वावर २०० वाहक आणि १०० अवजड वाहनचालक यांची भरती करणार असून त्यांना २२ सहस्र रुपये इतके एकूण मासिक वेतन दिले जाईल. वाहक पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे वैध वाहक परवाना (अनुज्ञप्ती) असणे आवश्यक आहे, तर अवजड वाहनचालकांसाठी अर्ज करणार्‍यांकडे वैध अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. या मुलाखती २५ आणि २६ जून असे २ दिवस सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत कदंब वाहतूक महामंडळाच्या पर्वरी येथील मध्यवर्ती कर्मशाळेत (सेंट्रल वर्कशॉपमध्ये) आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवार कदंब वाहतूक महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर सूचना आणि अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकतात. हा करार प्रारंभी एका वर्षासाठी असेल आणि आवश्यकतेनुसार तो वाढवला जाऊ शकतो. याविषयीची अधिक माहिती https://digitalgoa.com/kadambajobs/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.