गाद्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या मुसलमान विक्रेत्यांकडे परवाना नसल्याने हिंदूंनी दिले पोलिसांच्या कह्यात !

आधारकार्ड बनावट असल्याचा संशय

मालवण – सावंतवाडी येथून मालवण शहरात गाद्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या काही मुसलमान विक्रेत्यांकडे व्यवसायाच्या अनुषंगाने कोणताही परवाना नव्हता, तसेच त्यांच्यापैकी काहींच्या आधारकार्डवर एकच जन्मदिनांक होता. त्यामुळे ही आधारकार्ड बनावट असल्याचा संशय आल्याने ‘सकल हिंदु समाज’च्या धर्मप्रेमी हिंदूंनी या विक्रेत्यांना पोलिसांच्या कह्यात दिले.

शहरातील वायरी भागातील एका परप्रांतीय मुसलमान भंगार व्यावसायिकाने नुकत्याच भारतविरोधी घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे येथील सकल हिंदु समाज संतप्त झाला होता. त्या व्यावसायिकाच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर २५ फेब्रुवारीला सकाळी ७ मुसलमान सावंतवाडी येथून चारचाकी वाहनातून गाद्या घेऊन विक्रीसाठी मालवण शहरात आले आणि ते शहरात विविध ठिकाणी उतरले होते. येथील काही हिंदूंनी चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. या ७ जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, तसेच त्यांची आधारकार्ड संबंधित यंत्रणेकडे पडताळणीसाठी पाठवली आहेत.

३६ जणांची चौकशी

मालवण शहरात राष्ट्रविरोधी घोषणा देण्याची घटना घडल्यानंतर शिवसेनेचे स्थानिक आमदार नीलेश राणे यांनी जिल्ह्यात अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतियांची चौकशी करून कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना दिले. त्यानंतर मालवण पोलिसांनी तात्काळ कारवाई करून ३६ परप्रांतीय व्यक्तींची आधारकार्ड कह्यात घेऊन त्यांची सत्यता पडताळण्यासाठी पाठवली आहेत.