स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादि मी, अनंत मी’ या गीताला पुरस्कार !
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार’ घोषित केला आहे. वर्ष २०२५ पासून या पुरस्काराला प्रारंभ करण्यात येत असून पहिला पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला ..’ या अजरामर गीताला देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या ठिकाणी समुद्रामध्ये जगप्रसिद्ध उडी मारली, त्या फ्रान्समधील मार्सेलिस बंदरावरून मंत्री आशिष शेलार यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.

पहिल्या “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्काराची घोषणा !
पहिला “छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत” पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी… ” या अमर प्रेरणा गीताला दिला जात आहे.
आमचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे हा… pic.twitter.com/Fy07ae4OoS
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 25, 2025
मार्सेलिस बंदरामध्ये उडी मारल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर पुन्हा ब्रिटिशांच्या हाती लागले. त्यांच्यावर भारतात खटला चालवण्यात आला आणि त्यांना २ जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. जीवनाच्या या कठीण प्रसंगामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगति असा कवण जन्मला’, हे आत्मबळ वाढवणारे गीत स्फुरले.
महाराष्ट्र शासनाचा आदेश –

जाणून घ्या पुरस्काराचे स्वरूप आणि निवडीचे निकष !
सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रतिवर्षी ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार दिला जाणार आहे. २ लाख रुपये अशी या पुरस्काराची रक्कम गीतकारांना देण्यात येणार आहे. जे गीतकार हयात नाहीत, त्यांच्या वारसांना ही रक्कम देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी गीताची निवड करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी असलेले गीत हे किमान ५ वर्षे पूर्वीचे असणे आणि मराठी भाषेतून असणे बंधनकारक असणार आहे, तसेच हे राष्ट्र कार्यासाठी स्फूर्ती अन् प्रेरणा देणारे असावे, आदी निकष पुरस्कार गीतासाठी निश्चित करण्यात आले आहेत.
अनादि मी अनंत मी | स्वातंत्र्यवीर सावरकर | सुधीर फडके | स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
(सौजन्य : Savarkar Smarak) |