ऐसा मर्द मराठा पुन: पुन्‍हा जन्‍माला यावा…!

‘छावा’ चित्रपटाचे भित्तीपत्रक

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना करून महाराष्‍ट्रात चैतन्‍याचे एक नवे युग चालू केले; पण त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेब बादशाहसारख्‍या महाबलाढ्य शत्रूशी सतत ९ वर्षे निकराचा लढा देऊन या हिंदवी स्‍वराज्‍याचे रक्षण केले. छत्रपती शिवराय हे हिंदवी स्‍वराज्‍याचे ‘संस्‍थापक’, तर शंभूराजे त्‍या स्‍वराज्‍याचे ‘संरक्षक’ बनले.

‘एखादी व्‍यक्‍ती अत्‍यंत चैनी, ख्‍यालीखुशाली, रंगेल असती, तर मृत्‍यू समोर दिसत असतांना आणि शरिराचे हाल होत असतांनाही निर्भय अन् स्‍वाभिमानी राहील’, असे दृश्‍य दिसणार नाही; परंतु शंभूराजे ज्‍या अर्थी कष्‍ट सोसायला सिद्ध झाले आणि शेवटी त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यू झाला, त्‍याअर्थी त्‍यांची या प्रकारची जी प्रतिमा उभी करण्‍यात आली, ती चुकीची आहे. रंगेल मनुष्‍य केव्‍हाच शरण गेला असता. त्‍यांच्‍या कारकीर्दीचा एकूण ८ वर्षे आणि ८ मासांचा काळ विलक्षण धामधुमीचा ठरला. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि मोगल हे ४ शत्रू. त्‍यातही मराठेशाही नष्‍ट करण्‍याची प्रतिज्ञा घेऊन महाराष्‍ट्रात जातीनिशी उतरलेला महाशत्रू औरंगजेब ! या अल्‍पकाळात अनुमाने १२५ लढाया शंभूराजांनी लढल्‍या. औरंगजेबाने चिडून भूमीवर स्‍वतःची पगडी आपटली आणि शंभूराजांचे पारिपत्‍य केल्‍याखेरीज पगडी डोक्‍यावर न घालण्‍याची प्रतिज्ञा केली. त्‍याच्‍या ७ लाख फौजेशी आपल्‍या बेताच्‍या सामर्थ्‍यानिशी उणी पुरी ९ वर्षे शंभूराजांनी झुंज दिली. हा जगाच्‍या इतिहासातला अपूर्व पराक्रम आहे.

महाराष्‍ट्रातील मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती महाराणी ताराबाई यांच्‍यासह सहस्रो मावळ्‍यांच्‍या पराक्रमावर त्‍यांनी घडवलेल्‍या इतिहासावर तन- मन-धन अर्पून प्रेम करत आहे. ‘छावा’ हा हिंदी चित्रपट मराठीजनांसाठी एक अमूल्‍य भेट ठरणार आहे, असे अनेकांचे मत आहे. या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा महापराक्रम नव्‍याने संपूर्ण हिंदुस्‍थानभर घराघरांत पोचणार, हे नक्‍की !

– रवींद्र मालुसरे, अध्‍यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई.