अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली भारतीय राज्‍यघटना आणि पोलीस यांच्‍यावर टीका करणार्‍या कथित बुद्धीवाद्यांसाठी…

काही तरुण-तरुणींना मध्‍यरात्री दारूच्‍या नशेत असतांना पोलिसांनी हटकल्‍यावर त्‍यांच्‍यात वादविवाद झाल्‍याचा नाशिकमधील एक व्‍हिडिओ सध्‍या प्रसारित होत आहे. त्‍या व्‍हिडीओमध्‍ये दारूच्‍या नशेतील तरुण म्‍हणत आहे, ‘बाबासाहेबांनी राज्‍यघटना लिहिली आहे आणि मी मला पाहिजे ते बोलू शकतो.’ त्‍याच व्‍हिडिओमधील मुलगी पोलिसांना म्‍हणते, ‘तुम्‍ही आम्‍हाला अडवू शकत नाही. आमच्‍या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही’ वगैरे. त्‍या व्‍हिडिओवर येणार्‍या प्रतिक्रिया आणि नेहमीच ऐकायला-पहायला मिळणार्‍या काही गोष्‍टींवरून या संदर्भातील काही तथ्‍ये मांडतो.

१. भारतीय राज्‍यघटना वेगळे आणि भारतीय पोलीस वापरत असलेले कायद्याचे पुस्‍तक वेगळे. गुन्‍हेगारांच्‍या विरोधात वापरण्‍याचे ‘भारतीय दंड संहिता’ (इंडियन पिनल कोड) हे स्‍वातंत्र्याच्‍या आधीपासूनच, म्‍हणजे वर्ष १८६० पासून अस्‍तित्‍वात आहे; म्‍हणून त्‍याला ‘इंडियन पिनल कोड १८६०’ असे म्‍हणतात. ‘इंडियन पिनल कोड’ हे थॉमस मेकॉलेने लिहिले आहे.

श्री. तुषार दामगुडे

२. ‘आपण १८ वर्षांचे झालो, म्‍हणजे दारू पिऊ शकतो’, हा गैरसमज दूर करा. कुठल्‍याही सज्ञान व्‍यक्‍तीला दारू पिण्‍यासाठी किंवा एका विशिष्‍ट मर्यादेपर्यंत स्‍वतःजवळ दारू बाळगण्‍यासाठी परवाना (लायसन्‍स) असणे आवश्‍यक असते. महसूल खात्‍याच्‍या संकेतस्‍थळावरून हा परवाना काढता येईल.

३. पोलिसांना वाटल्‍यास ते कुठल्‍याही व्‍यक्‍तीला थांबवून त्‍याची चौकशी करू शकतात. त्‍या व्‍यक्‍तीवर संशय आला, तर त्‍याची अधिक चौकशी करण्‍यासाठी पोलीस ठाण्‍यात घेऊन जाऊ शकतात.

४. कायदा कुणीही लिहिला असला, तरी त्‍याची कार्यवाही करण्‍याचे अधिकार पोलीस आणि न्‍यायव्‍यवस्‍था यांना दिले आहेत. त्‍यामुळे एखाद्याचे वडील देशाचे कायदा मंत्री असले, तरी अन्‍वेषण आणि न्‍यायदान त्‍याचे वडील करणार नाहीत, तर पोलीसच करणार आहेत.

५. बस वा राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या (‘एस्.टी.’च्‍या) कर्मचार्‍यांशी वाद घातल्‍यास त्‍यांच्‍याकडे ‘तिकिटांच्‍या रकमेवर दरोडा घातला’ आणि ‘सरकारी कामात अडथळा आणला’, असे नामक हत्‍यार सरकारी कर्मचार्‍यांकडे असते. ते त्‍यांनी वापरल्‍यास या गुन्‍ह्यात जामीन मिळत नाही. किमान काही मास कारागृहात घालवावे लागतात.

६. राज्‍यघटनेत अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य असले, तरी कुठल्‍याही धर्माचा, प्रेषितांचा अपमान करणे, भारताच्‍या सार्वभौमत्‍वाला धोका पोचेल, असे कृत्‍य, लिखाण आणि भाषण करणे, हा गुन्‍हा आहे.

…पोलिसांना कायदा शिकवू नका !

हे सगळे सांगण्‍याचे कारण म्‍हणजे काही बावळट लोक सामाजिक माध्‍यमांवर पोलिसांच्‍या विरोधात चिथावणीखोर प्रतिक्रिया लिहितात किंवा एखादा व्‍हिडिओ प्रसारित करून ‘आपण आता प्रसिद्ध होऊ’, या अतीउत्‍साहाने नको तो शहाणपणा करायला जातात; परंतु यातून पश्‍चाताप करण्‍याखेरीज हाती काही लागणार नाही. सरकारी कर्मचारी असो वा एखाद्या इमारतीचा सुरक्षारक्षक असो, तुम्‍ही योग्‍य पद्धतीने बोलल्‍यास तेही योग्‍य बोलतात. काही विषय अत्‍यंत किरकोळ दंडात मिटून जात असतात, त्‍यासाठी आमदार, खासदार यांची ओळख दाखवणे आणि बाकीचे शहाणपण चालवू नका. सलमान खान अब्‍जाधीश आहे, पंतप्रधान, मुख्‍यमंत्री त्‍याच्‍या परिचयाचे आहेत; पण तरी त्‍याला कारागृहात, न्‍यायालयात जाणे-येणे करावे लागलेच ना ! त्‍यामुळे पोलिसांना कायदा शिकवू नका; पण तुम्‍ही सलमान खानपेक्षा मोठे असल्‍यास तुम्‍हाला शुभेच्‍छा !

– श्री. तुषार दामगुडे, पुणे. (१३.२.२०२५)