९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर भूषवणार आहेत. देशाच्या राजधानीत ७१ वर्षांनंतर हे साहित्य संमेलन होत आहे. मराठी भाषेला ‘अभिजात (समृद्ध) दर्जा’ मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर हा विशेष लेख…
१. देहली येथे होणारे मराठी साहित्य संमेलनाचे अनन्य साधारण महत्त्व
देहली येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खर्या अर्थाने मराठी भाषा आणि साहित्य यांसाठी मैलाचा दगड ठरेल, असे म्हणायला हरकत नाही. प्रतिवर्षी मराठी भाषेची साहित्य संमेलने निरनिराळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येतात. अनेक वेळा तर भारताबाहेरही आयोजित करण्यात आलेली आहेत; परंतु यावर्षीच्या या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला एक विशिष्ट आयाम आहे. हे मी अशासाठी म्हणतो की, नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्या अनुषंगाने मराठी भाषेचा सर्वांगीण विकास होऊ घातला आहे आणि कोणत्याही भाषेचा विकास म्हटला की, त्या भाषेमध्ये निर्माण होणारे साहित्य, साहित्यिकांचे योगदान आणि साहित्य संमेलने हे नितांत आवश्यक आहे; म्हणूनच हे साहित्य संमेलन देहली येथे होत असतांना त्याला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
मराठी भाषेविषयी बोलायचे झाल्यास पंतप्रधान मोदी हे या संमेलनाचे उद़्घाटक आहेत. त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम सर्वश्रुत आहे. अनेक वेळा त्यांच्या भाषणातून मराठी साहित्याविषयी आणि साहित्यिकांविषयी आपुलकी दिसून आलेली आहे. अनेक मराठी साहित्यिकांची नावे त्यांना मुखोद्गत आहेत. असा एक माणूस तोही देशाचा पंतप्रधान या साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून लाभावा, ही सर्व मराठी साहित्यिक आणि भाषा यांच्या दृष्टीने भाग्याचे आहे. भाषेचा विकास जसा दर्जेदार लिखाणातून होतो, चांगल्या वाचकातून होतो, तसाच तो आर्थिक पाठबळावरही अवलंबून असतो. अनेक वेळा पुष्कळ चांगले साहित्यिक प्रकल्प केवळ आर्थिक त्रुटींमुळे कार्यवाहीत आणता येत नाहीत. पर्यायाने त्या कार्यक्रमाची आणि भाषेची हानी होते. त्यामुळेच मोदींसारखी मराठी भाषा आणि साहित्यिक यांवर प्रेम करणारी राजकीय मंडळी यांचा पाठिंबा मराठी भाषेला मिळाला, तर ते अत्यंत आनंददायी ठरेल, यात दुमत असण्याचे कारण नाही.
२. ग्रामीण भागातील साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित होण्याच्या दृष्टीने करावयाचे प्रयत्न
आज ग्रामीण भागातील अनेक साहित्यिक दर्जेदार साहित्याची निर्मिती करत आहेत; परंतु आर्थिक दृष्टीकोनातून त्याचे प्रकाशन करणे परवडत नसल्याने असे साहित्य वाचकांसमोर येत नाही. परिणामी भाषेचा विकास खुंटतो. त्यामुळे देहली येथे होणार्या साहित्य संमेलनातून आणि अशाच प्रकारच्या अन्य साहित्य संमेलनांतून असे साहित्य प्रसिद्ध कसे करता येईल, यावर विचार मंथन व्हायला हवे. अर्थात मराठी साहित्य परिषदेसारख्या अनेक संस्था आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यांना जर आर्थिक पाठबळ मिळाले, तर नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करून ते वाचकांसमोर आणण्याचे कार्य त्यांना सुलभ रितीने करता येईल. ही आजची आवश्यकता आहे. त्यामुळे ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी साहित्यासाठी कार्यरत असणार्या संस्था यांनी अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ही मागणी राज्य अन् केंद्र सरकार यांच्या निदर्शनास आणावी, असे आग्रहाने नमूद करावेसे वाटते. तसे झाल्यास मराठी साहित्य विश्वात मोलाची भर पडेल आणि त्यातून प्रेरणा घेऊन अनेक नवीन साहित्यिक निर्माण होतील.
३. साहित्य निर्मितीसह वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे !
केवळ साहित्यिक निर्माण झाले, त्यांनी नवनवीन साहित्याची निर्मिती केली, नवीन पुस्तके प्रकाशित झाली; म्हणून त्या भाषेची प्रगती होते, असे मानता येणार नाही, हे निश्चितपणे खरे आहे. नवीन साहित्याची निर्मिती सातत्याने व्हायला हवी, तथापि अशी जी निर्मिती होते, तिला दर्जेदार वाचकही मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुष्कळ साहित्य निर्मिती झाली आणि ती पुस्तके, ते साहित्य प्रकाशकाकडे आणि वाचनालयातून पडून राहिले, तर खर्या अर्थाने भाषेची प्रगती होणार नाही; म्हणून भाषेची प्रगती होण्यासाठी निर्माण होणारे साहित्य वाचले गेले पाहिजे, त्यावर विचार केला पाहिजे, तरच त्यातून ज्ञानसाधना होईल आणि ती तशी व्हावी; म्हणून जनमानसात वाचनाचे महत्त्व, वाचन संस्कृती रूजावी म्हणून सातत्याने प्रयत्न व्हायला हवेत. अर्थात हे प्रयत्न होण्यासाठी खर्या अर्थाने वाचनालये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. वाचनालयांनी निरनिराळे कार्यक्रम आयोजित करून ‘वाचक आकृष्ट होतील’, असे उपक्रम राबवायला हवेत, जेणेकरून वाचकांची संख्या वाढीला लागेल आणि ज्ञानसाधना जोपासण्यास साहाय्य होईल. निर्माण झालेले नवनवीन साहित्य जनमानसात पोचेल, रूजेल आणि त्यातून नवीन साहित्यिक निर्माण होतील. असा हा भाषेच्या उन्नतीचा प्रवाह खळखळून वहाता ठेवणे, हे प्रकाशकासह वाचनालयांचेही काम आहे. वाचनालयांमध्ये कार्यरत असणार्या मंडळींनी याविषयी उत्साही असणे आवश्यक आहे. शासनस्तरावरून त्यांना आर्थिक पाठिंबा कसा मिळेल ?, हेही पाहिले जाणे महत्त्वाचे आहे. मला येथे नमूद करावेसे वाटते की, वाचन संस्कृती रुजवणे, हा भाषेच्या सर्वांगीण विकासाचा कळीचा मुद्दा आहे, हे सर्वमान्य आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री पूर्तता न करता वाचन संस्कृती रूजवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यासाठी सर्व जागरूक साहित्यप्रेमींचे योगदान मोलाचे ठरेल, असे मला वाटते.
४. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी उपक्रम राबवण्याविषयी संमेलनात ठराव करणे आवश्यक !
शाळा-महाविद्यालयातील मुलांना शिक्षक त्यांना नेमून दिलेल्या अभ्यासक्रम शिकवण्याकडे लक्ष देतात, ते योग्यच आहे. तथापि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना अभ्यासक्रमाबाहेरील अन्य पुस्तके वाचण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन केले, प्रेरित केले, तर भाषा आणि संस्कृती जोपासण्याचे पुष्कळ मोठे कार्य होऊ शकेल. प्राथमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये यांतून हे घडून येऊ शकते. त्यासाठी प्रत्येक विद्यालयामध्ये त्याच्या दर्जानुसार एक वाचनालय असणे आणि त्याचा वापर विद्यार्थ्यांनी करावा; म्हणून शिक्षकांनी त्यांना प्रेरित करणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. असे झाले, तर खर्या अर्थाने संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल. त्यामुळे अनिष्ट प्रवृत्तींना आळाही बसू शकेल, हा दुहेरी लाभ येथे अभिप्रेत आहे. यासाठी शासनाचे सहकार्य हवे. यासाठी होणारा व्यय हा शैक्षणिक व्यय म्हणून मानण्यास काहीच हरकत नाही. ही योजना खर्या अर्थाने कार्यवाहीत आली, तर शैक्षणिकदृष्ट्या आणि भाषेच्या उन्नतीच्या द़ृष्टीने पुष्कळ द़ूरगामी परिणाम साधणारी होईल, असे मानण्याला वाव आहे. साहित्य संमेलनाने यावर विचार मंथन करून असे ठराव घेऊन ते शासनाकडे पाठवावेत.
५. मराठी भाषेला उंच शिखर गाठता येण्यासाठी…
देहली येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेच्या उन्नतीला पूरक ठरेल, अशी एकूणच स्थिती आहे. आयोजकांनी सहभागी मान्यवरांचा हात घट्ट धरून वाटचाल केली, तर ते साध्य होईल. साहित्य आणि राजकारण असा भेदभाव न होता त्यांची एकजुटीने होणारी वाटचाल भविष्यात मराठी भाषेला उंच शिखर गाठायला साहाय्यभूत ठरेल, यात शंका नाही. देवी सरस्वतीचा वरदहस्त या सारस्वतांना लाभो आणि मराठी सारस्वतांचा दरबार उन्नतीची वाटचाल करो हीच प्रार्थना !
– श्री. राजस रेगे, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.२.२०२५)