मुंबईत शाळा प्रवेशासाठी बनावट दलालांकडून पालकांची लाखो रुपयांची फसवणूक !

पालकांनीही प्रवेशासाठी पैसे भरतांना सतर्कता बाळगावी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई – चांगल्या शाळेत प्रवेश घेतांना पालकांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. बोरिवलीमध्ये ३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्या पालकांची लाखो रुपयाची फसवणूक करण्यात आली. करिश्मा नावाच्या एका महिलेने ती ‘शिखा अकॅडमी स्कूल’ची ‘फ्री लान्सर एजंट’ (स्वतंत्र्यरित्या काम करणारी दलाल) असल्याचे सांगितले आणि एका महिलेशी संपर्क साधला. त्या महिलेकडून कागदपत्रांसह तिने सुमारे दीड लाख रुपये घेतले. बरेच मास उलटूनही प्रवेशाची माहिती मिळत नसल्याने महिलेने करिश्माला याविषयी विचारले. तेव्हा तिने शाळेच्या प्रवेशाच्या पावत्या दाखवल्या. शाळेत जाऊन पावत्या दाखवल्यावर त्या बनावट असल्याचे समजले. त्यानंतर करिष्माकडे पैसे मागितल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली.

संपादकीय भूमिका :

अशा बनावट दलालांकडून फसवणूक केलेले पैसे सव्याज वसूल करायला हवेत !