मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहितेच्या निर्णयाला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा पाठिंबा !

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांना अभिनंदनाचे पत्र !

श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री. सदा सरवणकर यांना अभिनंदनाचे पत्र देतांना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे शिष्टमंडळ

मुंबई – प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने लागू केलेल्या वस्त्रसंहितेच्या निर्णयाचे महाराष्ट्र मंदिर महासंघाने स्वागत करत त्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. या दृष्टीने महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अभिनंदनाचे पत्र श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री. सदा सरवणकर यांना देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संघटक श्री. प्रसाद मानकर, दादर येथील पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिराचे अध्यक्ष श्री. अजित पेंडुरकर, रायगड संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र सावंत, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता राहुल पाटकर, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड, अधिवक्त्या सुरभी सावंत, दादर येथील श्रीराममंदिराचे पुजारी श्री. गणेश शिरवणेकर, हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. स्वाती पांडे, सनातन संस्थेच्या सौ. प्राजक्ता मानकर, धर्मप्रेमी सौ. श्रुति सावंत आदी उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. सदा सरवणकर यांना श्री. प्रसाद मानकर यांनी मंदिर महासंघाच्या माध्यमातून चाललेले कार्य आणि त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, तसेच सर्व मंदिरांची एकता, समन्वय, त्यांची सुरक्षा, व्यवस्थापन आणि सनातन धर्माचा प्रसार यांविषयीही सविस्तर सांगितले.

या भेटीत अधिवक्ता प्रथमेश गायकवाड आणि अधिवक्ता राहुल पाटकर यांनी उत्तरप्रदेशाप्रमाणे वक्फ बोर्डाच्या संदर्भात महाराष्ट्रात कायदा झाला पाहिजे, तसेच वक्फ बोर्डानंतर ख्रिस्ती मिशनर्‍यांचीसुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भूमी आहे, या संदर्भातही सरकारने कायदा केलाच पाहिजे, यासंदर्भात सांगितले.

श्री. पेंडूरकर यांनी सांगितले की, मंदिरांत देवतांची हिंदु संस्कृतीप्रमाणे माहिती ‘डिजीटल बोर्ड’वर उपलब्ध झाली, तर भाविकांना त्याचा जास्त लाभ होईल. ‘मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मंदिरातील वातावरण अधिक पवित्र आणि शिस्तबद्ध राहील’, असे मत मंदिर महासंघाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.


हे वाचा → Maharashtra Mandir Mahasangh : सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करा !


हिंदु धर्मासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीन !

श्री. सदा सरवणकर म्हणाले, ‘‘महासंघाचे कार्य पुष्कळ चांगले आहे. मंदिरे सरकारमुक्त व्हावी, असा आमचासुद्धा प्रयत्न आहे. आम्हाला भक्तांच्या सोयीसाठी, तसेच आरोग्य निधीसाठीसुद्धा न्यासाच्या निधीचा वापर करता येईल. हिंदु धर्मासाठी अधिकाधिक निधी कसा उपलब्ध करून देता येईल, यासाठी मी प्रयत्न करीन. अन्य धर्मियांच्या लोकांना त्यांच्या प्रार्थनास्थळाकडून साहाय्य दिले जाते, मग आपल्या मंदिरांकडूनही आपल्या लोकांना अशा पद्धतीचे साहाय्य मिळाले पाहिजे.’’