शिवकालीन वाघनखांचे सातार्‍याहून नागपूरकडे प्रस्‍थान !

सातारा, २ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्‍तूसंग्रहालयामध्‍ये ठेवण्‍यात आलेल्‍या ऐतिहासिक वाघनखांचे नागपूरकडे प्रस्‍थान झाले आहे. १९ जुलै २०२४ या दिवशी लंडन येथील व्‍हिक्‍टोरिया अँड अल्‍बर्ट म्‍युझियम येथून भारतात आणलेली ऐतिहासिक वाघनखे येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्‍यात आली होती. या वाघनखांचे दर्शन आतापर्यंत ४ लाख ३० सहस्रांहून अधिक शिवप्रेमींनी घेतले आहे. ही वाघनखे पुरातत्‍व विभागाच्‍या सुरक्षिततेत नागपूर येथील मध्‍यवर्ती संग्रहालयात हालवण्‍यात आली आहेत. ब्रिटीश अधिकारी आणि पुरातत्‍व विभागाच्‍या विशेष पथकाच्‍या उपस्‍थितीत हा ऐतिहासिक हस्‍तांतरण सोहळा पार पडला. या वाघनखांच्‍या सुरक्षिततेसाठी विशेष बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.

लंडनहून आलेली वाघनखे सातारा, कोल्‍हापूर, मुंबई आणि नागपूर या ४ शहरांत प्रदर्शित केली जाणार आहेत. पुरातत्‍व विभाग आणि राज्‍य शासन यांनी सिद्ध केलेल्‍या वेळापत्रकानुसार ही वाघनखे १ फेब्रुवारी ते २ ऑक्‍टोबर २०२५ या कालावधीत नागपूर येथे दर्शनासाठी ठेवण्‍यात येणार आहेत. नंतर हे वाघनखे कोल्हापूर येथील वस्तुसंग्रहालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.