सातारा, २ फेब्रुवारी (वार्ता.) – समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांचा दौरा श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने या वर्षी अकोला, बुलढाणा, नागपूर येथे चालू होता. २ मासांनंतर हा दौरा आटोपून सातारा येथे ३१ जानेवारी या दिवशी सायंकाळी पादुकांचे आगमन झाले. या वेळी शिवतीर्थावर पादुकांचे भव्य स्वागत करण्यात आले.
पादुकांच्या स्वागतासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर शिव समर्थ भक्त आणि वारकरी संप्रदायाचे शेकडो पाईक उपस्थित होते. या वेळी पादुकांचे पूजन करण्यात आले. श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर सुवासिनींनी पंचारतीने ओवाळून पादुकांचे स्वागत केले. फुले आणि विद्युत् रोषणाईने सुशोभित केलेल्या श्रीराम आणि सीतामाईंच्या मूर्तीसमोर समर्थांच्या पादुका स्थापित करण्यात आल्या. यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मिरवणुकीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी चित्ररथ सिद्ध केले होते. चित्ररथावरील बाल समर्थ, अक्कास्वामी, वेण्णास्वामी, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ परंपरेतील अनेक शिष्य मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. मिरवणूक गांधी मैदानात आल्यावर शेकडो समर्थ भक्त आणि वारकरी यांनी पादुका यांचे स्वागत अन् पूजन केले.